‘सर्किट बेंच’साठी पुन्हा चर्चेस बोलवा
By admin | Published: August 3, 2015 11:38 PM2015-08-03T23:38:37+5:302015-08-04T00:07:34+5:30
मुख्य न्यायाधीशांनादुसऱ्यांदा पत्र
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करावे, या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीने मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांना सर्किट बेंचसाठी आम्हाला चर्चेसाठी बोलवा, अशा आशयाचे पत्र पुन्हा सोमवारी पाठविले आहे. तसेच आज, मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन याप्रश्नी चर्चा करणार असल्याचे कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. सर्किट बेंचप्रश्नी वकीलबांधवांनी यापूर्वी मोर्चे, निदर्शने, रॅली, आदी आंदोलने केली आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहित शहा यांनी ‘अॅडव्होकेट्स असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडिया’ यांच्याकडून महाराष्ट्रातील सर्किट बेंचप्रश्नी अभिप्राय मागितला होता. त्यांनी दिलेल्या अभिप्रायाने मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्याच्या मागणीला ‘खो’ बसला.या पार्श्वभूमीवर खंडपीठ कृती समितीची बैठक झाली. यावेळी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, या मागणीचा निर्णय उच्च न्यायालयाने २३ आॅगस्टपर्यंत न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कृती समितीने सोमवारी मुख्य न्यायाधीश शहा यांना सर्किट बेंच मंजूर करा; अन्यथा चर्चेसाठी बोलवा, अशा आशयाचे पत्र दुसऱ्यांदा पाठविले.