नगरपालिकेची विशेष सभा बोलवा
By admin | Published: January 21, 2016 11:20 PM2016-01-21T23:20:22+5:302016-01-22T00:53:04+5:30
काँग्रेसची मागणी : नगराध्यक्षांना निवेदन सादर
इचलकरंजी : राष्ट्रीय फेरीवाला धोरण आणि त्याची नगरपालिकेने केलेली अंमलबजावणी या राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण विषयांबाबत नगरपालिकेची विशेष सभा बोलवावी, अशी मागणी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी गुरुवारी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्याकडे केली.
राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत तयार करण्यात आलेल्या स्थानिक समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपशी निगडित असलेल्या बहुतांश फेरीवाल्यांचे पुनर्वसन मूव्हेबल गाळ्यांमध्ये झाले आहे. या मूव्हेबल गाळ्यांबाबत कॉँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. या विषयावर बुधवारी पालिकेतील मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कॉँग्रेसचे नगरसेवक व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती.
तसेच नगरपालिकेने डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आणि जानेवारीच्या पहिल्या सप्ताहात शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमणांतर्गत असलेली अनेक खोकी, फेरीवाल्यांच्या गाड्या हटविल्या होत्या. स्टेशन रोडवरील डेक्कनजवळ असलेल्या फेरीवाल्यांच्या गाड्या हटविल्यानंतर त्याठिकाणी काही ठरावीक गाड्यांचे पुनर्वसन झाल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे. म्हणून वरील आशयाच्या विषयाबरोबरच नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत केलेली कारवाई आणि डेक्कनजवळ असलेले अतिक्रमण अशा दोन विषयांबाबत कॉँग्रेसच्यावतीने नगराध्यक्षा बिरंजे यांना निवेदन दिले. या विशेष सभेला राजकीय वलय असल्यामुळे आणि सभा झाल्यास पालिकेत जोरदार शाब्दिक चकमक होण्याची शक्यता असल्याने नगराध्यक्षांकडून सभा केव्हा बोलावली जाते? याची उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)