मराठा आरक्षणप्रश्नी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:39 AM2018-08-28T00:39:44+5:302018-08-28T00:39:48+5:30
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ठराव करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन द्यावे, अन्यथा दि. ४ सप्टेंबरला मुंबईत धडक मोर्चा काढणारच, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.
‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे’ या मागणीसाठी दि. ४ सप्टेंबरला मुंबईत धडक मोर्चा काढण्याच्या नियोजनासाठी मंगळवार पेठेतील तालीम संस्था, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी सायंकाळी मंगळवार पेठेतील दत्ताजीराव काशीद सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी बाबासाहेब पाटील-लबेकर हे होते. यावेळी वसंतराव मुळीक, चंद्रकांत जाधव, संभाजीराव जगदाळे हेही प्रमुख उपस्थित होते.
मुंबईला ४ सप्टेंबरला काढण्यात येणाºया मोर्चाच्या नियोजनासाठी समिती स्थापन करून त्यांनी नियोजनाचा रोज आढावा घ्यावा, या मोर्चात जास्तीत जास्त लोकसहभाग असावा, अशा सूचना उद्योगपती चंद्रकांत जाधव यांनी मांडल्या.
वसंतराव मुळीक यांनी शासनाने धास्ती घेण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर जास्तीत जास्त संख्येने उतरावे, अशी सूचना केली. उद्या, बुधवारी मुंबईतील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षण प्रश्नासाठी राज्य शासनाने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याचे आश्वासन द्यावे, अन्यथा दि.४ सप्टेंबरला मोर्चा निघणारच, असा निर्धार केला.
संभाजीराव जगदाळे, बाबासाहेब पोवार-लबेकर, मनोज शिंदे, दीपक गौड, माणिक मंडलिक, किशोर डवंग, राजू भोसले, संग्राम देवणे, किसन कल्याणकर, आदींनी सूचना मांडल्या. यावेळी राजू पाटील, रवींद्र मुळीक, किसनराव काशीद, रमेश माने, काका चरापले, रमेश मोरे, तालीम संस्था, मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांची उद्या
भेट होण्याची शक्यता
मराठा आरक्षणावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी जिल्ह्णातील सर्वपक्षीय खासदार-आमदार यांना तारीख व वेळ द्यावी, अशी विनंती खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यांनी तारीख व वेळ कळवितो, असे सांगितले आहे. त्यानुसार उद्या, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी ही भेट होण्याची शक्यता आहे.