शिवसेनेकडून ‘कोल्हापूर’ची ‘नियोजन’वर बोळवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:07 AM2019-06-17T01:07:51+5:302019-06-17T01:07:55+5:30
राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोल्हापूरला ठेंगाच मिळाला आहे. राजेश क्षीरसागर यांना राज्य ...
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोल्हापूरला ठेंगाच मिळाला आहे. राजेश क्षीरसागर यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘दुधाची तहान ताकावर भागवली’ आहे. दोन खासदार आणि सहा आमदार दिले, अजून कोल्हापूरने काय केले पाहिजे? तेव्हा पक्षात सन्मान मिळू शकेल, अशी विचारणा ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांमधून केली जात आहे.
कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. कोल्हापूर शहरात सातत्याने शिवसेनेला यश मिळाले असले तरी सहकाराचे जाळे असलेल्या ग्रामीण भागात मात्र शिवसेनेला लोकांनी स्वीकारले नव्हते. पण सन २००९ ला ‘करवीर’मधून चंद्रदीप नरके आणि ‘हातकणंगले’मधून डॉ. सुजित मिणचेकर यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना पराभूत करत विधानसभेत प्रवेश केला तर शहरातून काँग्रेसचे मालोजीराजे यांचा राजेश क्षीरसागर यांनी पराभव केला. त्यानंतर सन २०१४ निवडणुकीत स्वतंत्र लढूनही सेनेचे दहापैकी सहा आमदार विजयी झाले. त्यामुळे कोल्हापूरला एक मंत्रिपद मिळणार, याची खात्री होती. मंत्रीपदासाठी सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके व राजेश क्षीरसागर यांनी फिल्डिंग लावली होती. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांच्या पराभवाचे उद्धव ठाकरे यांच्या मनातील शल्यच मंत्रिपदाच्या आड येत असल्याचे शिवसेना नेते खासगीत सांगत होते. त्यामुळे सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांसह जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांच्या टीमने आक्रमक प्रचार यंत्रणा राबवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या रूपाने शिवसेनेला दोन खासदार मिळाले. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसैनिकांच्या आशा वाढल्या होत्या. रविवारी विस्तारात मात्र कोल्हापूरकरांना उद्धव ठाकरे यांनी ‘कात्रजचा घाट’ दाखविल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
राजेश क्षीरसागर यांना जरी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असला तरी प्रत्यक्ष मंत्री आणि दर्जा असणे वेगळे आहे. यापूर्वी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात सन २००९ मध्ये राष्टÑवादीचे दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांना नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्षपद देत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कुपेकर यांचे बंड थंड केले होते.
ठाकरेंचे विधान परिषदेवरचे प्रेम कायम
सत्ता स्थापन करताना शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या बारा मंत्र्यांपैकी निम्म्या जागांवर विधान परिषदेच्या सदस्यांना संधी दिल्याने लोकांमधून निवडून गेलेल्या प्रतिनिधींमध्ये असंतोष होता. आताही एक पद राष्टÑवादीतून आलेले जयदत्त क्षीरसागर यांना, तर दुसरे यवतमाळमधून विधान परिषदेवर गेलेले तानाजी सावंत यांना देऊन ठाकरे यांनी विधान परिषदेवरचे प्रेम कायम राखल्याची चर्चा आहे.
विभागनिहाय बजेटचे नियोजन करणे
अर्थमंत्री प्रत्येक विभागाला बजेट देतात, त्याच्या नियोजनाची जबाबदारी या ‘नियोजन’ मंडळावर असते. क्षीरसागर कार्याध्यक्ष म्हणून जादा बजेट आणू शकतात.
शिवसेनेकडून आतापर्यंत कोल्हापूरला ही पदे मिळाली
संजय पवार, उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)- आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ.
वैशाली क्षीरसागर, कोषाध्यक्ष - पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती
विजय देवणे, संचालक - उर्वरित
विकास महामंडळ
शिवाजी जाधव, सदस्य - पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती.
सुनील शिंत्रे, सदस्य - खनिकर्म महामंडळ
मुरलीधर जाधव, सदस्य - हातमाग महामंडळ