बेळगावमधील कॅमेऱ्यामुळे उत्तराखंड बोगद्यातील लाईव्ह दृश्ये, अडकलेल्या कामगारांची नेमकी स्थिती कळण्यास मदत
By समीर देशपांडे | Published: November 23, 2023 12:10 PM2023-11-23T12:10:09+5:302023-11-23T12:11:03+5:30
बेळगावच्या पाणी योजनेसाठी आणला होता कॅमेरा
समीर देशपांडे
कोल्हापूर : एकीकडे उत्तराखंड उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांशी संपर्क करताना अडचणी येत असताना बेळगावहून पाठवलेल्या रोबोटिक कॅमेऱ्यामुळे या सर्वांची लाईव्ह दृश्ये आता उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे त्या बोगद्यातील अडकलेल्या कामगारांची नेमकी स्थिती कळण्यास मदत झाली आहे. एल अॅन्ड टी कंपनीने बेळगावच्या पाणी योजनेच्या देखभालीसाठी हा कॅमेरा आणला होता.
गेले नऊ दिवस हे कामगार बोगद्यात अडकले आहेत. त्यांना अन्न, पाणी दिले जात असले तरी त्यांची नेमकी स्थिती कशी आहे हे समजण्यात अनंत अडचणी येत होत्या. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एल अॅन्ड टी कंपनीचे कार्यकारी संचालक एस. एम. सुब्रमण्यम यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी या कंपनीचा एक अतिशय छोटा रोबोटिक कॅमेरा बेळगाव येथे असल्याचे सांगण्यात आले. गडकरी यांच्या सूचनेनुसार बेळगावमधील हा कॅमेरा घेऊन या कंपनीचे दोन अभियंते दौदीप खान्रा आणि बाळकृष्ण किलारी हे सोमवारी संध्याकाळी उत्तराखंड येथे पाेहोचले.
तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी तेथे कार्यरत असलेल्या जवानांच्या मदतीने लगेचच कामाला सुरुवात केली. रोबोटिक कॅमेरा बोगद्यामध्ये सोडण्यात आला आणि रात्री दोन वाजता आत अडकलेल्या ४१ कामगारांची लाईव्ह दृश्ये या कॅमेऱ्याच्या माध्यमातून उपलब्ध झाली. मंगळवारी सकाळपासूनच ही दृश्ये दूरचित्रवाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्यात आली असून यातून कामगारांची स्थिती समजून येत आहे.
बेळगावच्या पाणी योजनेसाठी आणला होता कॅमेरा
बेळगाव शहराची पाणी योजना एल अॅन्ड टी कंपनीकडून तीन वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आली असून या योजनेची देखभालदेखील याच कंपनीकडे आहे. जलवाहिनीमधील अडथळे आणि गळती करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी हा रोबोटिक कॅमेरा आणण्यात आला होता. हाच कॅमेरा या कामासाठी तातडीने उत्तराखंडला पाठवण्यात आल्याचे या कंपनीचे बेळगावमधील व्यवस्थापक हार्दिक देसाई यांनी सांगितले.