स्वच्छता अभियान ३९ टन कचरा गोळा, पंचगंगा घाट, दसरा चौकात मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 11:42 AM2019-10-07T11:42:59+5:302019-10-07T11:45:31+5:30
पंचगंगा नदीघाट परिसरासह दसरा चौक, आदी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महानगरपालिकेने लोकसहभागातून सलग २४ व्या रविवारी महास्वच्छता अभियान राबविले. नेहमीप्रमाणे या अभियानात महापालिकेचे कर्मचारी, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांसह सामाजिक संस्थांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. सकाळी राबविलेल्या या मोहिमेत सुमारे ३९ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले.
कोल्हापूर : पंचगंगा नदीघाट परिसरासह दसरा चौक, आदी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महानगरपालिकेने लोकसहभागातून सलग २४ व्या रविवारी महास्वच्छता अभियान राबविले. नेहमीप्रमाणे या अभियानात महापालिकेचे कर्मचारी, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांसह सामाजिक संस्थांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. सकाळी राबविलेल्या या मोहिमेत सुमारे ३९ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले.
बिंदू चौक येथे के. एम. टी. कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलताना, कोल्हापूर शहर, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करावयाची आहे. त्यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. दर महिन्यातून एकदा स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे. प्लास्टिकचा वापर करू नका व इतरांनाही करू देऊ नका, असे सांगितले.
मोहिमेकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. आयुक्त दिवाकर कारंडे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता आर. के. जाधव, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. अभियानामध्ये विवेकानंद, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल, अॅग्रीकल्चर कॉलेज, राजर्षी शाहू महाराज कृषी विद्यालय, स्वरा फौंडेशन, वृक्षप्रेमी व मॉर्निंग वॉकर्स ग्रुप यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला.
स्वच्छता मोहीम राबविलेली ठिकाणे
पंचगंगा नदीघाट परिसर, दसरा चौक सर्व मुख्य रस्ते, हुतात्मा पार्क , जयंती नाला, संप आणि पंप हाऊस, मोतीनगर ते शेंडा पार्क फुटपाथ, बिंदू चौक पार्किंग, टेंबलाई मंदिर, रंकाळा शाहू स्मृती गार्डन, रिलायन्स मॉल मागे, पद्माराजे गार्डन व पाचगाव परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
कोणी, कोठे केली स्वच्छता
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या वतीने पद्माराजे गार्डन येथे स्वच्छता मोहीम राबविली. वृक्षप्रेमी ग्रुप व स्वरा फौंडेशनच्या वतीने जयंती नाला मागील परिसर साफ करून वृक्षारोपण केले. आरोग्य विभाग व के. एम. टी. कर्मचाऱ्यांनी बिंदू चौक पार्किंगची स्वच्छता केली. यावेळी विवेकानंद कॉलेज एन. सी. सी. व एन. एस. एस.चे १०, राजर्षी शाहू महाराज कृषी विद्यालय ६०, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल ५०, अॅग्रीकल्चर कॉलेजचे ५० विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, वृक्षप्रेमी ग्रुप ३० व स्वरा फौंडेशनचे १५ कार्यकर्ते यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला. टेंबलाई मंदिर येथे प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली.
औषध फवारणी
या अभियानासाठी पाच जेसीबी, पाच डंपर, महापालिकेचे २५० सफाई कर्मचाºयांच्या साहाय्याने ही स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छता केल्यानंतर रोगराई पसरू नये; यासाठी परिसरात धूर व औषध फवारणी, ब्लीचिंग पावडर टाकण्यात आली.
पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, उपशहर रचनाकार नारायण भोसले, सहा. उद्यान अधीक्षक अर्पणा जाधव, प्राथमिक शिक्षण विभागाचे बाबा साळोखे, पर्यावरणवादी उदय गायकवाड, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, करण लाटवडे, मनोज लोट, शुभांगी पोवार, महेश भोसले, नंदकुमार पाटील, मुनीर फरास, अरविंद कांबळे, सुशांत कावडे, आर्क्टिटेक अँड इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, पारस ओसवाल, आरोग्य, के. एम. टी.कडील कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.