कोल्हापूर शहरातील मोकाट जनावराविरोधात महापालिकेची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:02 PM2019-06-28T12:02:42+5:302019-06-28T12:03:58+5:30
कोल्हापूर शहरात रस्त्यांवर मोकाट व भटक्या जनावरांविरोधात महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी दिवसभरात या पथकामार्फत ताराबाई पार्क, राजारामपुरी, भवानी मंडप, शिवाजी चौक या परिसरांत विशेष मोहीम राबविली. त्यामध्ये सहा मोकाट गाई पकडून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर : शहरात रस्त्यांवर मोकाट व भटक्या जनावरांविरोधात महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी दिवसभरात या पथकामार्फत ताराबाई पार्क, राजारामपुरी, भवानी मंडप, शिवाजी चौक या परिसरांत विशेष मोहीम राबविली. त्यामध्ये सहा मोकाट गाई पकडून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये भटक्या व मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढलेला आहे. या जनावरांमुळे वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत असल्याबाबत तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मोकाट जनावरे बंदोबस्त पथकामार्फत आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत एकूण सहा गाई पकडल्या आहेत.
या गार्इंच्या मालकांकडून २००० रुपये दंड भरून घेऊन पुन्हा गाई उघड्यावर न सोडण्याच्या अटीवर परत करण्यात आल्या. या मोहिमेमध्ये विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक करण लाटवडेकर व सहायक आरोग्य निरीक्षक विनोद नाईक व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
शहरातील नागरिक, व्यावसायिक यांनी त्यांची पाळीव जनावरे रस्त्यांवर न सोडता बंदिस्त ठेवावीत. यापुढेही मोकाट जनावरे बंदोबस्त पथकामार्फत नियमितपणे कारवाई करण्यात येणार आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.