शेतकरी आत्महत्या निवारणासाठी अभियान

By admin | Published: September 21, 2015 10:52 PM2015-09-21T22:52:12+5:302015-09-22T00:10:53+5:30

राजू शेट्टी : महिन्याभरात केंद्र व राज्य शासनाला अहवाल देणार

Campaign for the prevention of suicides by farmers | शेतकरी आत्महत्या निवारणासाठी अभियान

शेतकरी आत्महत्या निवारणासाठी अभियान

Next

सांगली : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्याबरोबरच आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्या निवारण अभियान आम्ही राबविणार आहोत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, राज्यात गेल्या काही वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासनामार्फत या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे, मात्र आत्महत्या होऊच नयेत, यासाठी प्रयत्नांची गरज आहे. कर्जामुळे खचलेल्या व चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, याचा विचार सुरू आहे. राज्यातील विशेषत: विदर्भातील दहा गावांचा सर्व्हे यासाठी करणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंब तसेच कर्जामुळे अडचणीत आलेले अन्य शेतकरी यांच्याशी चर्चा केली जाईल. सविस्तर अभ्यास करून याविषयीचा एक अहवाल आम्ही तयार करणार आहोत. केवळ परिस्थितीचा अहवालच नव्हे, तर त्यामध्ये आम्ही काही उपायसुद्धा सुचविणार आहोत. शेतकऱ्याला आत्महत्याच करावी लागू नये, अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. दहा वर्षाच्या कालावधीसाठी शेतकऱ्याला कर्ज मिळावे. त्या कर्जावरील व्याज शासन व सामुदायिक सामाजिक दायित्व योजनेतून भागविण्यात यावे. तसेच कर्जाचे संकटकाळात पुनर्गठन झाले पाहिजे. शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर मालकी सदरी कोणत्याही बॅँकेचे अगर सोसायटीचे नाव लागता कामा नये. इतर हक्कात वित्तीय संस्थेचे नाव असावे. अशाप्रकारच्या अनेक उपाययोजनांमधून राज्यात शेतकऱ्यांसाठी चांगले वातावरण तयार करता येऊ शकते. येत्या महिन्याभरात आम्ही याबाबतचा अहवाल केंद्र व राज्य शासनाला सादर करणार आहोत. (प्रतिनिधी)

सावकार व नातलगांचेच कर्ज अधिक
आत्महत्या केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी सावकार व नातवाईकांकडून कर्ज घेतले होते. सावकारी तगादा असह्य होत असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे बॅँकांकडून शेतकऱ्यांना सहजरित्या कर्जपुरवठा उपलब्ध झाला पाहिजे, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

‘नाम’ला पाठिंबा
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या फाऊंडेशनचा उपक्रम चांगला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा त्यास पाठिंबा आहे. आत्महत्या होऊच नयेत म्हणून आम्ही जी मोहीम हाती घेणार आहोत, त्यासाठी त्यांनीही प्रयत्न करावेत, असे आवाहन शेट्टी यांनी केले.
पदांसाठी वाट पाहू
घटकपक्षांनी सत्तेतील सहभागासाठी यापूर्वी बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर कोणतीही बैठक झाली नाही. मात्र आम्ही सरकारला यासाठी वेळ देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पदांसाठी आताच कोणताही आमचा आग्रह नाही. योग्यवेळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे शेट्टी म्हणाले.

Web Title: Campaign for the prevention of suicides by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.