gram panchayat election: गावगाड्यासाठी हलगी कडाडली; प्रचाराचे नारळ फुटले, राजकीय हवा तापली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 01:37 PM2022-12-10T13:37:02+5:302022-12-10T13:37:29+5:30
१८ डिसेंबर रोजी मतदान होत असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येईल, तसे वातावरण तापतच जाणार
कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली असून गावोगावी प्रचाराची हलगी कडाडली आहे. शुक्रवारी सकाळी मुहूर्तावर बहुतांशी गावात प्रचाराचे नारळ फुटले असून एकीकडे थंडी वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला राजकीय हवा मात्र गरम होऊ लागली आहे.
जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी सुरु झाली होती. माघारीच्या प्रक्रियेत ४३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहे. त्यामुळे सध्या ४३१ गावांत निवडणुकीचा ज्वर चढू लागला आहे. या गावात सरपंचपदासाठी १४५६ तर सदस्यपदासाठी ८ हजार ९९५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बुधवारी माघार झाल्यानंतर पॅनल बांधणी करुन प्रचार यंत्रणा सक्रिय झाली, मात्र बहुतांशी गावात शुक्रवारी प्रचाराचे नारळ फुटले.
ग्रामदैवतांना साकडे घालून सकाळी प्रचाराची हलगी कडाडली. गल्लोगल्ली मतदारांना नमस्कार करत प्रचार फेऱ्या काढण्यात आल्या. त्यानंतर प्रभाग निहाय व्यक्तिगत गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. आणाभाका व इतर क्लुप्त्यांचा सर्रास वापर सुरु आहे. एकीकडे थंडीचा कडाका वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण थंडीतही गरम होऊ लागले आहे. मतदान १८ डिसेंबर रोजी होत असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येईल, तसे वातावरण तापतच जाणार आहे. साम, दाम, दंड या नीतीचा वापर सर्रास सुरु असल्याने काही गावांत आतापासूनच तणावाचे वातावरण आहे.
शक्ती प्रदर्शनाने प्रचाराचा प्रारंभ
प्रचाराचा प्रारंभ करताना प्रत्येक गावात दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. प्रारंभ करतानाच एकमेकांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न झाल्याने वातावरण तापू लागले आहे.
प्रचारासाठी जायचे कोणाकडे?
घराशेजारचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. भावकी भावकीत दोन-तीन उमेदवार असल्याने प्रचारासाठी जायचे कोणाकडे असा प्रश्न प्रत्येक गावात आहे. रोज उठून एकमेकांची तोंडे बघायची. जो तो आपण त्याच्यापेक्षा चांगला कसा हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय गटासोबत नसणाऱ्यांची गोची झाली आहे.