शेतकऱ्यांना मिळणार कालव्याचे पाणी
By admin | Published: April 28, 2015 10:55 PM2015-04-28T22:55:44+5:302015-04-28T23:45:27+5:30
अभियंत्यांचे आश्वासन : म्हाकवेसह सीमाभागाला दिलासा--लोकमतचा प्रभाव
म्हाकवे : काळम्मावाडी धरणाच्या निढोरी शाखेतून अंतर्गत उजव्या कालव्यातून सोडले जाणारे पाणी म्हाकवेसह हदनाळ, आप्पाचीवाडी आणि सीमाभागातील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या शिष्टमंडळाला दिले. याबाबत ‘लोकमत’मधून सोमवारी (दि. २७) ‘म्हाकवेतील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडली होती.
या कालव्यातून सोडले जाणारे पाणी म्हाकवेच्या २५ कि. मी. च्या पुढील आणि सीमाभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. कालव्याची गळती, पोट कालव्याचे कमकुवत दरवाजे, सुरुवातीच्या गावातील शेतकऱ्यांचा आडमुठेपणा, कालव्यावर देखरेख करण्यासाठी अपुरे कर्मचारी, यामुळे हे पाणी म्हाकवेतील तसेच सीमाभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही.
याबाबत जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, कागल तालुकाप्रमुख अशोक पाटील, निवृत्ती पाटील, शामराव तिपे, शरद पाटील, आदींनी अभियंता पाटील यांची भेट घेऊन निवेदनही दिले. यावेळी पाटील यांनी शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी अडथळे दूर करण्याचे आश्वासन दिले.
‘लोकमत’चे आभार
शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा विषय असो, अथवा कालव्यामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा विषय असो, ‘लोकमत’ने तो अत्यंत प्रभावीपणे मांडून त्याच्या यशस्वीतेपर्यंत पाठपुरावा केला जातो. याबाबत शेतकऱ्यांच्यावतीने शिवसेनेचे शाखाप्रमुख निवृत्ती पाटील यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.