कणेरी मठावर ६५ एकरांत साकारतेय शाहूनगरी
By admin | Published: January 8, 2015 12:16 AM2015-01-08T00:16:18+5:302015-01-09T00:07:24+5:30
भारतीय संस्कृती उत्सव : इतिहासाची मांडणी अन् भविष्याचा वेध;‘गावांचा विकास आणि स्वावलंबी परिवार’ हा उद्देश
कोल्हापूर : भारताच्या महानतेचे दर्शन येथील सांस्कृतिक परंपरांमधून प्रतिबिंबित होते. ही परंपरा ‘गावांचा विकास आणि स्वावलंबी परिवार’ या उद्देशातून, कणेरीमठामधील तब्बल ६५ एकर जागेत साकारत असलेल्या शाहूनगरीत उत्सवाच्या रूपाने मांडली जात आहे. अवकाश, निसर्गाचा अभ्यास मांडणाऱ्या ज्ञानी ऋषींपासून सुरू होत असलेल्या या उत्सवात विज्ञान, आरोग्य, पर्यावरण, स्त्री-शक्तीचा जागर आणि शेतीतील विविध प्रयोग, महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय या सगळ्या बलस्थानांचा इतिहास आणि भविष्याचा वेध घेतला जाणार आहे. देशाचे उज्ज्वल भवितव्य आणि गावांचा विकास या विधायक उद्देशातून देशातील स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या आणि ‘भारत विकास संगम’ नावाची संस्था आकाराला आली. कणेरीतील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून ‘भारतीय संस्कृती उत्सव’ आकाराला आला. शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि संस्कृती या पाच मूलभूत गोष्टींना आधारभूत धरून उत्सवाची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. उत्सवाला १२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी दानशूरांचे हात पुढे येताहेत. देणगीप्रमाणेच श्रमदानाची या उत्सवासाठी मोठी गरज असून, त्यात रोज किमान शंभर लोक योगदान देत आहेत. उत्सवाला अजून दहा-बारा दिवस शिल्लक असूनही येथील तयारी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. या उत्सवात देखावे, प्रदर्शनाबरोबरच विविध विषयांवर चर्चा, परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात विविध क्षेत्रांतील देशपातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
देणगीपासून श्रमदानापर्यंत...
कोल्हापूरच्या नावलौकिकात आणि पर्यटनवृद्धीसाठी चालना देणाऱ्या या उत्सवासाठी लहान मुलांनी जमा केलेल्या खाऊच्या पैशांपासून ते नगरसेवक, शासकीय कर्मचाऱ्यांचे मानधनही देणगी स्वरूपात मिळत आहे. ६५ एकरांच्या जागेत साकारण्यात येत असलेल्या या उत्सवासाठी शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, एनएसएसचे विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक आपल्या परीने श्रमदान करीत आहेत. आजच मध्य प्रदेशमधून ४० आदिवासी कार्यक्रमस्थळी दाखल झाले. उत्सवकाळात दिवसाकाठी लाखभर लोक उपस्थित राहणार असून, त्यांच्या जेवणाच्या सोयीसाठी नागरिक धान्य, तेलाचे डबे, नारळ अशा रूपांत मदत करीत आहेत. आसपासच्या प्रत्येक गावांतून चपात्यांचे संकलन केले जाणार आहे.
लखपती शेती... गो प्रदर्शन
शेतीत उत्पन्न नाही, अशी ओरड केली जात असताना या ठिकाणी मात्र लखपती शेतीचे स्वप्न वास्तवात उतरले आहे. सेंद्रिय शेतीची पद्धत अवलंबून अवघ्या एक एकराच्या जागेत उसापासून बायोगॅस, टेरेस गार्डन, दारातच फळभाज्यांची लागवड, विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, तुरी, भाज्या, फुलझाडे, केळी, पपई, भुईमूग, सोयाबीन, लसूण, मुळा... अशी अनेक उत्पादने घेत कुटुंबाची गरज भागून महिन्याला लाखाचे उत्पन्न मिळवून देणारी ही ‘लखपती शेती’ या उत्सवात येणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांची आकर्षण असणार आहे. याशिवाय उत्सवांतर्गत २१ ते २३ तारखेदरम्यान गार्इंचे प्रदर्शन व विक्रीही आयोजित करण्यात आली आहे.
ऋषिपरंपरा... योग
ज्याकाळी विज्ञान शून्यावस्थेत होते, त्यावेळी भारतातील ज्ञानी ऋषींनी अवकाश मंडल, निसर्ग, स्थापत्याबद्दल यशस्वी संशोधन सिद्ध केले. ही परंपरा, गुरुकुल पद्धती, समुद्रमंथन हा सगळा देखावा या ठिकाणी नागरिकांना पाहायला मिळेल. ‘आरोग्य’ या विषयावर एक स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. ज्यात पंचकर्म ते योग, प्राणायाम यांचा समावेश आहे.
शाहू कलादालन
या उत्सवाच्या परिसराला ‘शाहूनगरी’ असे नाव देण्यात आले असून, प्रवेशद्वारातच गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलवर शाहू महाराज चहा घेत असल्याची घटना मांडण्यात आली आहे. शिवाय छत्रपती शाहू कलादालनात शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग चित्रांच्या माध्यमातून रेखाटले आहेत. तसेच जुने कोल्हापूर, या शहराला लाभलेली चित्र-शिल्प परंपरा, चित्रपटसृष्टी, भारतातील विविध कलाकृती, संगीत-नाट्य-नृत्य कलांच्या संपन्नतेच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती येते.