जन्म मृत्यू दाखल्यासाठी घरफाळा सक्ती आदेश रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:20 AM2020-12-23T04:20:45+5:302020-12-23T04:20:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जन्म व मृत्यूचे दाखले मागणी केल्यास संबंधित व्यक्तीने घरफाळा भरल्याबाबतचा ना हरकत दाखला देण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जन्म व मृत्यूचे दाखले मागणी केल्यास संबंधित व्यक्तीने घरफाळा भरल्याबाबतचा ना हरकत दाखला देण्याची सक्ती अखेर महापालिका प्रशासनाने मंगळवारी रद्द केली. त्यासंबंधीचे आदेश सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांनी काढले. यासंदर्भात नागरिकातून संताप व्यक्त झाला होता तसेच आदेशाची होळी करण्यात आली होती.
महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाने अन्य विभागांशी समन्वय ठेवून उत्पन्नवाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी कोल्हापूर शहरातील स्थानिक रहिवाशांपैकी जर कोणी नागरिक जन्म अथवा मृत्यूचा दाखला मागणीकरीता अर्ज करत असेल तर प्रथम त्या अर्जासोबत चालू आर्थिक वर्षातील संपूर्ण घरफाळा भरला असल्याबाबतचा घरफाळा विभागाचा ‘ना हरकत दाखला’ असलेखेरीज त्या नागरिकांचे जन्म अथवा मृत्यूचे दाखले मागणीचे अर्ज स्वीकारू नयेत, असे आदेश काढले होते.
- आता जप्तीपूर्व नोटीस देणार -
नागरी सुविधा केंद्रांकडून प्राप्त झालेल्या यादीप्रमाणे दाखला देण्यात आलेल्या मिळकतधारकांची थकबाकी असल्यास अशा मिळकतधारकांना तत्काळ जप्तीपूर्व नोटीस लागू केल्या जातील, असे घरफाळा विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.