तासिका कमी करण्याचा आदेश तत्काळ रद्द करा
By admin | Published: May 4, 2017 11:15 PM2017-05-04T23:15:53+5:302017-05-04T23:15:53+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : कला, क्रीडा विषयांचे शिक्षक; शैक्षणिक व्यासपीठ उतरले रस्त्यावर
कोल्हापूर : ‘कला व शारीरिक शिक्षण व आरोग्य विषयांच्या शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘तासिका कमी करण्याचा अन्यायी आदेश रद्द करा’, अशा घोषणा देत कला, शारीरिक शिक्षण व आरोग्य विषयाचे शिक्षक गुरुवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
पुणे येथील विद्या प्राधिकरणच्या शिक्षण आयुक्त संचालकांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून कला, शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण विषयांच्या तासिका कमी करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश रद्द करावा आणि तासिका पूर्वीप्रमाणे ठेवाव्यात, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित केला होता. सकाळी पावणेअकरा वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मागण्या आणि सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत भर उन्हात मोर्चा पुढे सरकत होता. व्हीनस कॉर्नर, उद्योग भवनमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रोखले. यावर आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी ठिय्या मारला. यानंतर येथे निषेध सभा झाली. तसेच आंदोलनकर्त्यांनी या आदेशाच्या परिपत्रकाची होळी केली. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले.
आंदोलनात व्ही. जे. देशमुख, एस. बी. उमाटे, विनय पाटील, पी. के. पाटील, प्रभाकर आरडे, डी. एम. पाटील, ए. एस. निकम, सी. आर. गोडसे, राजाराम वरुटे, वसंत पाटील, आदींसह सुमारे एक हजार शिक्षक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
तासिकांतील बदल...
२८ एप्रिल २०१७ च्या आदेशानुसार कला व शारीरिक शिक्षण या विषयांच्या तासिकांमध्ये कपात केल्याचे नमूद केले आहे. पहिली व दुसरीच्या वर्गासाठी दर आठवड्याला पूर्वी या विषयांसाठी पाच तास निश्चित होते. नव्या आदेशानुसार चार तास दिले आहेत. तिसरी ते पाचवीसाठी पाच तासांऐवजी तीन तास, सहावी ते आठवीसाठी चार तासांऐवजी दोन तास, तर नववी व दहावीसाठी तीन तासांऐवजी दोन तास दिले आहेत. आठवड्यात आठ तास कमी केल्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांवरही हा अन्याय आहे. नववीसाठी आरोग्य व कला रसस्वाद हे विषय अनिवार्य होते. मात्र, आता नव्या आदेशानुसार ते श्रेणीमध्ये वर्ग केल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी झाले आहे.
ंआदेश रद्द करण्याबाबत कोण, काय म्हणाले?
एस. डी. लाड (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ) : कला, क्रीडा, आरोग्य शिक्षण या विषयांच्या तासिकांमध्ये कपात करण्याचा आदेश रद्द करावा. अन्यथा, जूनमध्ये शाळा सुरू होऊ देणार नाही.
बी. एस. खामकर (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ ) : शालेय पातळीवर ‘खेळ’ या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन असेल, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विचार करावा.
खंडेराव जगदाळे (उपाध्यक्ष, राज्य कायम विनाअनुदान शाळा संघटना) : आपल्या शिक्षकबांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आता लढ्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सर्वांनी तयार राहावे.
व्ही. जी. पोवार (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ) : कला, क्रीडा, आरोग्य विषयांच्या तासिका पूर्वीप्रमाणे कायम करून संबंधित शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सरकारने न्याय द्यावा.
भरत रसाळे (राज्याध्यक्ष, राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती) : या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठाने पुकारलेल्या लढ्यात सर्व शिक्षकांनी सहभागी होऊन ताकद द्यावी.
दादा लाड (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा कला अध्यापक संघ) : या शिक्षकांवर सरकारकडून मोठा अन्याय होत आहे. तो दूर करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा देणे महत्त्वाचे आहे.
आर. डी. पाटील (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शारीरिक
शिक्षक संघटना) :
एकीकडे मुलांना क्रीडा क्षेत्रातील करिअरसाठी प्रोत्साहन द्या, असे सरकार म्हणते. आणि दुसरीकडे कला, क्रीडा, आरोग्य विषयांच्या तासिका कमी करते. सरकारची ही भूमिका विसंगत आहे.
तासिकांतील बदल...
२८ एप्रिल २०१७ च्या आदेशानुसार कला व शारीरिक शिक्षण या विषयांच्या तासिकांमध्ये कपात केल्याचे नमूद केले आहे. पहिली व दुसरीच्या वर्गासाठी दर आठवड्याला पूर्वी या विषयांसाठी पाच तास निश्चित होते. नव्या आदेशानुसार चार तास दिले आहेत. तिसरी ते पाचवीसाठी पाच तासांऐवजी तीन तास, सहावी ते आठवीसाठी चार तासांऐवजी दोन तास, तर नववी व दहावीसाठी तीन तासांऐवजी दोन तास दिले आहेत. आठवड्यात आठ तास कमी केल्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांवरही हा अन्याय आहे. नववीसाठी आरोग्य व कला रसस्वाद हे विषय अनिवार्य होते. मात्र, आता नव्या आदेशानुसार ते श्रेणीमध्ये वर्ग केल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी झाले आहे.