‘चिकोत्रा’तील उपसाबंदीचा आदेश रद्द करा
By admin | Published: October 4, 2015 11:18 PM2015-10-04T23:18:37+5:302015-10-05T00:04:43+5:30
शिवसेनेची मागणी : अपुरा पाणीसाठा; पाटबंधारेच्या अभियंत्यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन
पांगिरे : चिकोत्रा प्रकल्पातील उपसाबंदी आदेश काढून कापशीपर्यंतच्या शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करून, चिकोत्रा प्रकल्पातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पाणी सोडू न देण्यासंदर्भात जो उपसाबंदी आदेश काढलेला आहे, तो रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्यावतीने शिवसेना उपतालुकाप्रमुख अशोक पाटील, संतोष देशपांडे, विक्रम पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता (दक्षिण) विजय पाटील यांच्याकडे दिले आहे.शेतकऱ्यांच्यावतीने निवेदनात म्हटले आहे की, चिकोत्रा लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांवर शासनाने जाणीपूर्वक अन्याय केला आहे. प्रकल्पाच्या उभारणीत कापशीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे फार मोठे योगदान आहे. या शेतकऱ्यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चिकोत्रा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना चार एकरांच्या स्लॅबप्रमाणे जमिनी दिल्या आहेत. मात्र, यावर्षी या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात कमीपर्जन्यमानामुळे पाणीसाठा कमी झाला असून प्रशासनाकडून प्रकल्पातील पाणीसाठ्याचा कोणताही विचार व नियोजन न करता दि. २७ सप्टेंबर १५ ते ८ आॅक्टोबर १५ या कालावधीत उपसाबंदी आदेश काढण्यात आला आहे. परिस्थिती फार नाजूक असून या ११ दिवसांमध्ये कडक उन्हाळ्यामुळे उसाचे कांडे वाळणार असून, वजन कमी होण्याचा धोका आहे. आम्हाला हक्काचे पाणीसुद्धा मिळत नाही.
मात्र, उपसाबंदी आदेश करून प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या ५० टक्के पाणी कापशीपासून बेळुंकीपर्यंतच्या शेतकऱ्यांना देऊन अनुकूल परिस्थिती तयार करण्याचे काम आपल्याकडून केले जात आहे. कागल तालुक्यास कोणतीही कमतरता भासू न देण्याचे प्रयत्न दिसत आहेत. कागल तालुक्यातील वीज वितरण कंपनीला हाताशी धरून उपसाबंदीचे आदेश असूनसुद्धा पाण्याचा उपसा केला जात आहे. हिरव्या पट्ट्याबाहेर पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. कापशीपर्यंतच्या बंधाऱ्याची नदीच्या रुंदीमुळे पाण्याची साठवण क्षमता व त्याखालील बंधाऱ्यांची पाण्याची साठवण क्षमता यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विषमता दिसून आली आहे.
तसेच या निवेदनामध्ये चिकोत्राचा समांतर प्रकल्प म्हणून नागणवाडी (दिंडेवाडी बारवे) प्रकल्पाला मान्यता मिळून ४० ते ५० टक्के काम पुनर्वसनामुळे गेले १५ वर्षे अर्धवट पडले आहे. ते पूर्ण करावे व चिकोत्रा खोऱ्यातील पाण्याची अडचण दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर अशोक पाटील, संतोष देशपांडे, बाजीराव दुधाळे, नारायण शेवाळे, गोविंद निरलगी, एकनाथ सावंत, बापूसो गुरव, दिलीप कदम, पांडुरंग कांबळे, सर्जेराव शिंदे, विशाल पाटील, आदींच्या सह्या आहेत.