रितेशकुमार यांची बदली रद्द करा
By admin | Published: April 16, 2015 12:21 AM2015-04-16T00:21:07+5:302015-04-16T00:23:37+5:30
‘भाकप’च्या बैठकीत मागणी : आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
कोल्हापूर : फक्त एक वर्षाचा सेवा कार्यकाळ झाला असताना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांच्या झालेल्या अचानक बदलीमुळे सरकारची भूमिका संशयास्पद वाटत आहे. यामुळे भाकप नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास ठप्प होऊ शकतो. यासाठी रितेशकुमार यांची बदली रद्द करावी, अशी मागणी बुधवारी भाकपच्या कार्यकर्त्यांनी केली. या संदर्भात आज, गुरुवारी जिल्हाधिकारी राजाराम माने यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले जाणार आहे.
बिंदू चौक येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांच्या अचानक झालेल्या बदलीबाबत चर्चा झाली. एक वर्षाचा कार्यकाळ झाला असतानाही त्यांची अचानक बदली होते. हे करून सरकारला गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडू द्यायचे नाही आहे का? असा प्रश्न उभा राहतो. रितेशकुमार यांच्या चांगल्या पद्धतीने आताच तपास सुरू केला आहे. यासाठी त्यांनी राज्यासह इतर राज्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन तपासाच्या दृष्टीने आपली कार्यवाही सुरू ठेवली आहे. तपासासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ पथके नेमण्यात आली आहेत. असे असताना त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे तपास ठप्प होऊ शकतो. तसेच भाकपच्या कार्यकर्त्यांनी तपासाबाबत रितेशकुमार यांच्यावर तपासाबाबत कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित न करता बदलीचीही मागणी केलेली नाही. असे असताना सरकारने अचानक केलेली बदली संशयास्पद वाटत आहे, अशा भावना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या संदर्भात आज, गुरुवारी दुपारी दोन वाजता पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यामध्ये पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास दोन महिने होऊनही लागलेला नाही. तो जलदगतीने होऊन मारेकऱ्यांना तातडीने पकडावे, रितेशकुमार यांचा तपास शीघ्रगतीने सुरू आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.
बैठकीला दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, नामदेव गावडे, अनिल चव्हाण, एस. बी. पाटील, मिलिंद कदम, राजू यादव, सुशीला यादव, आशा कुकडे, शिवाजी शिंदे, विक्रम कदम, दिलदार मुजावर, सुभाष वाणी, उमेश पानसरे, उमेश सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.
गोयल यांच्या बदलीची अडचण
पानसरे हत्येचा तपास करणारे अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची काही दिवसांत पदोन्नतीवर बदली होणार आहे. त्यांची बदली झाल्यास या प्रकरणाचा तपासच कोलमडणार आहे. त्यामुळे त्यांचीही बदली रद्द व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.