..अखेर 'तो' आदेश रद्द, दूध संस्थांना मोठा दिलासा
By राजाराम लोंढे | Published: December 11, 2023 04:55 PM2023-12-11T16:55:09+5:302023-12-11T16:55:27+5:30
कोल्हापूर : राज्यातील ५० लिटिरपेक्षा दूध संकलन कमी असलेल्या दूध संस्था अवसायनात काढण्याचे आदेश पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयाने दिले होते, यामुळे ...
कोल्हापूर : राज्यातील ५० लिटिरपेक्षा दूध संकलन कमी असलेल्या दूध संस्था अवसायनात काढण्याचे आदेश पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयाने दिले होते, यामुळे जिल्ह्यातील ११०८ संस्थांना सहायक निबंधकांना ‘मध्यंतरीय’ अवसायनाचे नोटीस काढली होती. ती नोटीस रद्द करण्याचे आदेश पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयाने काढल्याने संस्थांना दिलासा मिळाला आहे.
दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्यातील ‘पदुम’ अंतर्गत नोंदणी असलेल्या संस्थांची स्वच्छता मोहीम हातात घेतली होती. राज्यातील बंद पडलेल्या व पोटनियमानुसार पूर्तता न करणाऱ्या दूध व पशुसंवर्धन संस्था अवसायनात काढण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत.
त्यानुसार सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांनी जिल्ह्यातील ११०८ संस्थांना ‘मध्यंतरीय’ अवसायनाचे आदेश काढल्याने खळबळ उडाली होती. तीस दिवसांत याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे संस्था पातळीवर अस्वस्थता होती. मुळात संकलन सुरु असलेल्या संस्थांना अवसायनात काढता येत नाही.
लम्पीसह दुष्काळामुळे दूध संकलन कमी झाले आहे, अशा परिस्थितीत प्राथमिक दूध संस्था टिकवणे अवघड झाले असताना अवसायनात काढणे अन्यायकारक आहे. त्यामुळे हा आदेश रद्द करत असल्याचे सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) शहाजी पाटील यांनी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे यांना कळवले आहे.