‘वारणा मिनरल्स’चा भाडेकरार रद्द करणार
By admin | Published: February 25, 2016 01:15 AM2016-02-25T01:15:26+5:302016-02-25T01:15:26+5:30
उद्योग विभागाकडून अंतिम निर्णय घेतला जाणार
कोल्हापूर : येळवण जुगाई (ता. शाहूवाडी) येथील वारणा मिनरल्स कंपनीकडून खनिज उत्खननाचा भाडेकरार रद्द करण्याबाबत शासनाच्या उद्योग विभागाने सकारात्मकता दर्शविली आहे. वनविभागाने उर्वरित कागदपत्रे सादर केल्यानंतर उद्योग विभागाकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय दि. २१ मार्चला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीपूर्वी देणे बंधनकारक आहे. त्यामुळे काही तरी निर्णय हा घ्यावाच लागणार आहे.
वारणा मिनरल्स खाण प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावण्या सुरू आहेत. पुढील सुनावणी दि. २१ मार्चला होणार आहे. तत्पूर्वी वन व उद्योग सचिवांनी एकत्रित बसून याबाबत निर्णय घेऊन तो सुनावणीवेळी सादर करावा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी मंत्रालयात उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे, कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी अभय भोगे आदी उपस्थित होते.
वारणा मिनरल्स कंपनीला येळवण जुगाई येथे खनिज उत्खननासाठी शासनाच्या उद्योग विभागाकडून भाडेकरारानुसार परवानगी देण्यात आली आहे. त्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी हा भाडेकरारच रद्द करणे तत्त्वत: मान्य असल्याचे उद्योग विभागाकडून सांगण्यात आल्याचे समजते. या विभागाची भूमिका ही भाडेकरार रद्द करण्याबाबत सकारात्मक असली तरी या
बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. यासाठी वनविभागाकडून आणखी कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. ती मिळाल्यानंतरच यावर उद्योग विभागाकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ही कागदपत्रे आज, गुरुवारीच वनविभागाकडून सादर केली जाणार असल्याचे समजते. यासंदर्भात आता पुन्हा बैठक होणार असून थेट निर्णयच होईल. हा निर्णय पुढील दि. २१ मार्चला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी देणे बंधनकारक राहणार आहे. तत्पूर्वी काही तरी निर्णय घ्यावाच लागणार आहे. (प्रतिनिधी)