आघाडीला शोधावा लागणार उमेदवार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:15 AM2019-08-01T01:15:56+5:302019-08-01T01:16:00+5:30

राम मगदूम । लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दाखवली आणि त्यांच्या ...

Candidate to find the front! | आघाडीला शोधावा लागणार उमेदवार !

आघाडीला शोधावा लागणार उमेदवार !

googlenewsNext



राम मगदूम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दाखवली आणि त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी ‘भाजप’चा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला तर ‘चंदगड’मध्ये काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे.
१९९५ ते २००९ पर्यंत तीनवेळा गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघात चढत्या मताधिक्याने निवडून येण्याचा पराक्रम केवळ बाबासाहेब कुपेकर यांनीच केला. त्यानंतर पुनर्रचित चंदगड विधानसभा मतदासंघाच्या पहिल्या आमदारकीचा मानदेखील त्यांनीच मिळविला. नेतृत्वाने दिलेल्या संधीचे सोने करीत त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी केली. त्यामुळे गेली
२२ वर्षे हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहिला.
आणीबाणीनंतरच्या काँगे्रसविरोधी लाटेतदेखील पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव निवडून आलेले माजी आमदार स्व. डॉ. घाळी यांच्या पश्चात सक्षम व सर्वसमावेशक नेतृत्वाचा अभाव आणि अंतर्गत गटबाजीमुळे याठिकाणी पक्ष म्हणून काँगे्रस कधीच नेटाने उभी राहिली नाही. म्हणूनच, जर नंदातार्इंनी भाजपमध्ये प्रवेश केला तर जिल्ह्यातील एखाद्या मतदारसंघाची आदलाबदल करून ‘चंदगड’वर हक्क सांगण्यासाठी काँग्रेसकडेदेखील आज खमक्या उमेदवार नाही.
नंदातार्इंनी भाजपमध्ये प्रवेश केला तर गेल्यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याविरोधात बंडखोरी केलेले स्व. कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांना किंवा चंदगडचे माजी आमदार स्व. नरसिंगराव पाटील यांचे चिरंजीव राजेश पाटील यांना आॅफर देण्याशिवाय राष्ट्रवादीसमोर अन्य पर्याय आजतरी नाही.
स्वाती कोरींना संधी ?
जनता दलाने काँगे्रस आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला तर ‘चंदगड’ची जागा जनता दलाला आणि त्या बदल्यात जनता दलाने ‘कागल’ मतदारसंघात आमदार हसन मुश्रीफ यांना मदत करायची, अशी तडजोड झाल्यास आघाडीची उमेदवारी प्रा. कोरी यांना मिळण्याची शक्यता अधिक आहे.
विद्याधर गुरबेंना संधी ?
गडहिंग्लजचे उपसभापती विद्याधर गुरबे यांनी युवक काँगे्रसच्या माध्यमातून गडहिंंग्लज विभागात संघटना बांधण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपकडून गडहिंग्लज पंचायत समितीची सत्ता काढून घेण्याबरोबरच आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीतही त्यांनी ‘काँगे्रसचा हात’ सभागृहात पोहोचविला आहे. आमदार सतेज पाटील यांनी आग्रह धरल्यास आघाडीच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव पुढे येवू शकते.
नंदाताई भाजपमध्ये गेल्या तर ?
नंदातार्इंनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ‘राष्ट्रवादीची टीम’ त्यांच्यामागे येईल आणि स्व. कुपेकरप्रेमी जनतेची मते आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी मिळेल. त्याचा फायदा ‘चंदगड’प्रमाणेच ‘कागल’ मतदारसंघातही होईल, अशी आशा भाजपला आहे.
राष्ट्रवादी व काँगे्रसकडे सध्या तेवढ्या ताकदीचा उमेदवार नसल्यामुळे राष्ट्रवादीला उमेदवार आयात करावा लागेल. त्यासाठी प्राधान्याने संग्रामसिंह कुपेकर व राजेश पाटील यांच्या नावाचा विचार होईल.
कॉंग्रेस आघाडीमध्ये स्वाभिमानी व जनता दल सहभागी झाले तर त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडावा लागेल. तसे झाले तर अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी किंवा राजेंद्र गड्यान्नावर यांना संधी मिळू शकते.

Web Title: Candidate to find the front!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.