gram panchayat election: सरपंचपदाच्या रिंगणात, अक्षता पडताच नववधूसह उतरला प्रचारात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 05:03 PM2022-12-10T17:03:51+5:302022-12-10T17:17:56+5:30
वरात निघण्या ऐवजी उतरले थेट प्रचारात
दिलीप चरणे
नवे पारगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली असून गावोगावी प्रचाराची हलगी कडाडली आहे. प्रचाराचे नारळ फुटल्याने थंडी वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला राजकीय हवा मात्र गरम होऊ लागली आहे. अशातच हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव येथील सरपंच पदाचे उमेदवार असलेले सम्राट सर्जेराव गायकवाड यांची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याच कारणही खास हाय..
सरपंचपदाचे उमेदवार सम्राट सर्जेराव गायकवाड यांचा काल, शुक्रवारी लग्न सोहळा पार पडला. लग्न सोहळा पार पडताच मुंडावळ्यासहित हे नवदाम्पत्य प्रचारात उतरले. नवरा-नवरीची वरात निघण्या ऐवजी थेट प्रचारात उतरावे लागले या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.
सम्राट हे जुने पारगावच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुक रिंगणात आहेत. त्यांचा किणी येथील तेजस डोईफोडे हिच्याशी काल शुक्रवारी (दि.९) विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. लग्न समारंभ पार पडल्या नंतर वधू-वर ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी गेले. अन् ग्रामदैवतांच्या दर्शनानंतर प्रचारासाठी थेट गावातील वार्ड गाठला. मतदार या घटनेमुळे अचंबित झाले. गावात सर्वत्र या घटनेची चर्चा रंगली होती.