उमेदवार नवखे; पण पारंपरिक लढतीचा ‘बाज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:21 AM2021-02-15T04:21:16+5:302021-02-15T04:21:16+5:30

कोल्हापूर : नवख्या पण तुल्यबळ उमेदवारांना रिंगणात उतरवून लढत अधिक चुरशीची ठरणारा मतदारसंघ म्हणून प्रभाग क्र. ३४ शिवाजी ...

Candidate novice; But the ‘falcon’ of traditional fighting | उमेदवार नवखे; पण पारंपरिक लढतीचा ‘बाज’

उमेदवार नवखे; पण पारंपरिक लढतीचा ‘बाज’

Next

कोल्हापूर : नवख्या पण तुल्यबळ उमेदवारांना रिंगणात उतरवून लढत अधिक चुरशीची ठरणारा मतदारसंघ म्हणून प्रभाग क्र. ३४ शिवाजी उद्यमनगर या प्रभागाकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. उमेदवार नवखे असले तरीही त्यांच्या आडून खऱ्या अर्थाने पारंपरिक लढत होणार असल्याचे प्राथमिक चित्र आहे. उमेदवार तुल्यबळ देण्यासाठी येथे सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.

नावाने शिवाजी उद्यमनगर प्रभाग असला तरीही मूळचा उद्ममनगरात मतदार कमी आणि औद्योगिक संस्थाच अधिक, अशीच रचना असल्याने शिवाजी उद्ममनगर या औद्योगिक वसाहतीचा मूलभूत विकास हा नेहमी खुंटलेला ठरत आहे. सध्या या मिनी औद्योगिक वसाहतीत शासनाच्या फौण्ड्री क्लस्टर योजनेतून भरमसाठ विकास निधी आल्याने रस्ते सुसाट बनले. विकासकामांतच महापालिकेचा औद्योगिक वसाहत निधी २५ लाख रुपयेही दरवर्षी सुरू केला.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागावर ओबीसी पुरुष आरक्षण पडल्यामुळे येथील अनेक इच्छुकांचे मनसुबे उधळले होते. त्यातच फाळके यांच्या वतीने फुटबॉल खेळाडू सचिन पाटील यांना नगरसेवकपदाची नामी संधी मिळाली. त्यांनी सुमारे सहा कोटी रुपये खर्चून प्रभागात विकासगंगा खेचून आणण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी प्रभागावर माजी महापौर रामभाऊ फाळके, दिवंगत उदय फाळके यांनी वर्चस्व गाजवले आहे. २०१०-१५ या कालावधीत स्वीकृत नगरसेवकपदाची धुरा सांभाळलेले विनायक फाळके यांनी पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा तयारी केली; पण आरक्षणामुळे त्यांना थांबावे लागून त्यांनी सचिन पाटील यांना निवडून आणले. त्याची परतफेड म्हणून सचिन पाटील यांनी आता फाळके यांच्या पत्नी पूजा विनायक फाळके यांच्या विजयासाठी व्यूहरचना आखली आहे. साहजिकच फाळके यांची राष्ट्रवादीकडून उमेदवारी पक्की मानली जाते. त्याशिवाय २००५-१० या कालावधीत नगरसेवक व परिवहन समिती सभापतीपद भूषवीत विकासकामावर पकड निर्माण केलेले अजित मोरे यांच्या पत्नी मंजिरी मोरे- देसाई याही रिंगणात उतरत आहेत. त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली आहे. उच्चशिक्षित व गोखले महाविद्यालयाच्या उत्तम प्रशासनाधिकारी म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्या बळावरच त्यांनी अभ्यासू नगरसेवक होण्याचे स्वप्न बाळगले आहे. रेणुका महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रियांका संदीप पाटील यांनीही शिवसेनेच्या उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

मराठा आरक्षणासह विविध आंदोलनांत सक्रिय राहिलेले सचिन तोडकर यांच्या पत्नी धनश्री तोडकर यासुद्धा भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. त्या जिजाऊ फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा असून, त्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीत जोरदार तयारी केली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते विशाल शिराळकर यांनीही विरोधकांना तगडे आव्हान उभे केले होते. या निवडणुकीत त्यांच्या पत्नी पूजा शिराळकर यांच्या माध्यमातून ते निवडणूक लढवत आहेत. त्यांनीही भाजपकडे उमेदवारी मागितली आहे.

काँग्रेसचे कार्यकर्ते इंद्रजित नलवडे यांनीही पत्नी सुप्रिया नलवडे यांनाही रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे, त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. शिवाजी उद्यमनगर प्रभागात प्रत्येक उमेदवार तुल्यबळ असला तरीही त्या प्रत्येक उमेदवारामागे त्यांच्या पतीच्या प्रभागातील सामाजिक कार्याची शिदोरी ही विजयासाठी योगदान ठरणारी राहणार आहे.

पाच वर्षांतील विकासकामे :

- कचरा वेळेवर उठाव.

- सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या इमारतीवर शेड बांधून गळती थांबवली.

- प्रभागातील अंतर्गत रस्ते ९० टक्के पूर्ण.

- औषध व धूरफवारणी आठवड्यातून दोन वेळा.

- नियोजनामुळे पाणी प्रश्न निकाली.

- पाणी प्रश्न बहुतांशी निकाली.

शिल्लक राहिलेली कामे :

- अनियमित पाणी.

- हुतात्मा पार्क उद्यान अविकसित.

- रस्ते समस्या.

- वेळेवर औषध फवारणी नाही.

- ओपन स्पेस अविकसित.

- औद्योगिक वसाहतीत रहिवाशांना अपुरे चटई क्षेत्र.

- रुईया विद्यालयाची दुरवस्था.

कोट..

प्रभागात जास्तीत जास्त मूलभूत सुविधांवर भर देऊन समस्यांचे निराकारण केले. त्यासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी खर्च केला. नागरी प्रश्न समजावून घेऊन त्यांची सोडवणूक केली.

-सचिन पाटील, नगरसेवक

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते :

-सचिन पाटील (राष्ट्रवादी) : १,८०५

- दीपक स्वामी (अपक्ष) : १,३२८

- अभय कामत (शिवसेना) : ५०४

- विशाल शिराळकर (अपक्ष) : ३०८

Web Title: Candidate novice; But the ‘falcon’ of traditional fighting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.