उमेदवार शोधमोहीम
By admin | Published: August 8, 2015 12:31 AM2015-08-08T00:31:35+5:302015-08-08T00:31:35+5:30
महानगरपालिका निवडणूक : पक्षांच्या हालचाली गतीमान; इलेक्टिव्ह मेरिटला प्राधान्य
कोल्हापूर : महानगरपालिका प्रभागाची निश्चिती आणि त्यावरील आरक्षण जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व ताराराणी आघाडी यांनी निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार आपल्याकडे खेचण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. निवडून येणाऱ्या उमेदवारांसाठी पक्षप्रमुखांनी त्यांना वेगवेगळे शब्द देण्यासही सुरुवात केली आहे. पक्षाची उमेदवारी घेतल्यास आर्थिक मदत आणि मतदारसंघातील जोडण्या करून देण्याची जबाबदारीही पक्षाचे कारभारी घेत आहेत.
महापालिकेवर आपली सत्ता आणायचीच या इराद्याने सर्वच राजकीय पक्ष आखाड्यात उतरल्याने उमेदवारांनाही काहीसा फायदा होणार आहे. निवडून येण्याची शक्यता असलेल्या असलेल्या उमेदवारांची त्यामुळे चलती सुरू आहे. एकाच उमेदवाराला दोन-तीन पक्षांचे नेते भेटत आहेत. आमची उमेदवारी घ्या, बाकीचं आम्ही बघतो, अशी गळ पक्षातर्फे घातली जाऊ लागली आहे; परंतु उमेदवारी बेरकीही असल्याने त्यांनी अद्याप कोणाला शब्द दिलेला नाही. ‘पाहूया, नंतर सांगतो’ अशी उत्तरे दिली जात आहेत.
राष्ट्रवादीची जोरात तयारी
एकहाती तंबू असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने जोरात तयारी सुरू केली असून सर्व प्रभागांत मातब्बर उमेदवार देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. आतापर्यंत ६३ प्रभागांत निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचा पक्षाकडून शोध पूर्ण झाला आहे. लवकरच पक्षाकडे उमेदवारी मागण्याचे अर्ज भरून घेतले जाणार असल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली.
पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सक्षम उमेदवारांचा शोध घेण्याची जबाबदारी माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर आणि स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास यांच्यावर सोपविली आहे. विद्यमान नगरसेवकांना प्राधान्य देण्याचे पक्षाचे धोरण आहे किंवा त्यांच्या पत्नीला अथवा ते सांगेल त्या सक्षम उमेदवाराला उमेदवारी दिली जाणार आहे.
शिवसेना, भाजप, ताराराणी इच्छुकांच्या शोधात
शिवसेना व भाजप या पक्षांनी पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचे धोरण ठरविले असले तरी काही भागात जर चांगले उमेदवार मिळाले तर त्यांना सन्मानाने पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाणार आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी सर्व सूत्रे आपल्या हातात ठेवली असून, त्यांनी जोरात तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व रणनीती ठरविण्याची जबाबदारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी स्वत:कडे घेतली आहे. ताराराणी आघाडीचे कारभारी सुनील मोदी, सुनील कदम, सत्यजित कदम व सुहास लटोरे मात्र उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी कामाला लागले आहे.
कॉँग्रेसमध्ये अद्याप शांतता
कॉँग्रेस पक्षानेही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी नेतृत्व कोणी करायचे यासंबंधीचा विषय अद्याप संपुष्टात आलेला नाही. पक्षाचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार सतेज पाटील, मालोजीराजे हे चौघे नेते एकत्र येऊन निवडणुकीची रणनीती ठरविणार आहेत. सध्या सतेज पाटील सक्रिय असले तरी अन्य तिघे सक्रिय झालेले नाहीत. मालोजीराजे तर त्यांची भूमिका कार्यकर्त्यांशी बोलून घेणार आहेत. त्यामुळे चौघे एकत्र येणे आणि पुढील प्रक्रिया सुरू होणेच अडचणीचे दिसत आहे. पण, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सतेज पाटील यांनी आपल्या हक्काच्या प्रभागात तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सध्या तरी कॉँग्रेसमध्ये एकसंधपणा दिसत नाही. नुकत्याच झालेल्या कॉँग्रेस समितीमधील मेळाव्यास आजी-माजी नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांची अनुपस्थिती हे त्याचेच लक्षण होते. दरम्यान कॉँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणाऱ्या उमेदवारांनी विहीत अर्ज भरून देणे आवश्यक असून त्याची सुरुवात जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारपासून झाली.