उमेदवारांची ‘कोटी’ची उड्डाणे; भेटवस्तू घरपोच
By admin | Published: September 30, 2014 01:03 AM2014-09-30T01:03:40+5:302014-09-30T01:04:02+5:30
मतदारांची अवस्था : निवडणुकीमुळे दसरा-दिवाळी जोरात : ‘किती घेशील दोन्ही हाताने’
संतोष पाटील ल्ल कोल्हापूर
दसरा आणि दिवाळी या मोठ्या सणांच्या मधेच होत असलेली विधानसभा निवडणूक, आघाडी व युतीच्या ‘घटस्फोटा’मुळे प्रत्येक मतदारसंघात असलेली उमेदवारांची रेलचेल, निवडणूक प्रचारासाठी १५ दिवसांचाच अवधी असल्याने वाट्टेल त्या मार्गाने मतदारराजाला ‘खूश’ करण्याचा भावी आमदारांचा प्रयत्न, त्यामुळे ‘किती घेशील दोन्ही हाताने’ अशी अवस्था मतदारांची झाली आहे. शक्कल लढवित आचारसंहितेला पद्धतशीर फाटा देत उमेदवारांची कोटीची उड्डाणे सुरू आहेत.
प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे मते अजमावत असल्याने मतदारसंघातील सर्व गणितेच उलटी-सुलटी झाली. अनेकांना शेवटच्या क्षणी मैदानात पाचारण केले. प्रत्येक मतदारसंघात किमान चार ते सहा मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. यातच निवडणूक प्रचारासाठी अत्यंत कमी कालावधी मिळणार आहे. काहीही करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येकाचा आटापिटा सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने दसरा-दिवाळीसारखा मोठा सण ‘कॅश’ करण्यासाठी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात हातही सैल केला आहे.
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत आतापासूनच मतदारांच्या घरी भेटवस्तू पाठविण्यात येत आहेत. यामध्ये गृहिणींसाठी शालू व पैठणीपासून घरगुती वापराच्या वस्तूंचा समावेश आहे. काहींनी भेटवस्तूच्या स्वरूपात चांदीची आपट्याची पाने देण्यास सुरुवात केली आहे. पैंजण, जोडवी, नाकातील नथ, कमरेचा छल्ला महिलांना भेट देऊन ‘गृहमंत्र्यां’ना खूश केले जात आहे. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने महिलांना भेटवस्तू दिल्या जातात. कुटुंबातील सदस्य संख्येप्रमाणे जेवणावळीसाठी हॉटेल्स व मंगल कार्यालयांत होणाऱ्या जेवणासाठी कुपन्स तर नित्यांचीच बाब बनली आहे.
मतदानानंतर दिवाळी येत आहे. मात्र, दिवाळीचे पदार्थ करण्यासाठी लागणारे तेल-तूप-मैदा-साखर-मसाला, आदी सर्व साहित्य दसऱ्यानंतरच्या आठवडाभरात शहरातील सर्वच घरांत पोहोच के ले जाणार आहे. घरातील मतदारांच्या संख्येनुसार किराणा मालाच्या तयार ‘पॅकेज’ची जोडणी आतापासूनच हाती घेतली आहे. यासाठी गल्लीतील कार्यकर्त्यांकडून माहिती घेऊन किराणा दुकानदारांना त्याप्रमाणे मालाची आॅर्डरही देण्यात आली आहे. ज्या मतदारांना असे पॅकिंग नको आहे किंवा उमेदवारांजवळ यंत्रणा नाही, त्यांनी रोख रकमेची कुपन्स तयार केली आहेत.
दिवाळीच्या शुभेच्छा स्वरूपात रंगानुसार किंमत असलेली ही कुपन्स दाखवून संबंधित दुकानांतून मनासारखा बाजार खरेदी करता येणार आहे. ‘पॉश’ एरियातील मतदारांना ‘कॅश’ करण्यासाठी मोठ्या मॉल्स्चे ‘गिफ्ट व्हाऊचर्स’चे वाटप सुरू आहे. या सर्व व्यवहारात उमेदवाराचा कोणताही थेट संबंध नसल्याने ही कोटीची उड्डाणे आचारसंहितेचा भंग ठरत नाहीत.
‘पाच वर्षांनंतरच ‘हा’ तोंड दाखविणार. मतदान कोणाला करायचे त्याला करू, घरी आलेली लक्ष्मी कशाला परत घालावा’, असे म्हणत सर्व स्तरातील मतदार उमेदवारांच्या या ‘शुभेच्छा’ मोठ्या आदराने स्वीकारत आहेत.