आरक्षणामुळे पक्षांना करावी लागणार उमेदवारांची शोधाशोध
By Admin | Published: September 8, 2015 12:08 AM2015-09-08T00:08:08+5:302015-09-08T00:31:15+5:30
प्रभागात इच्छुक कमी : ताराराणी आघाडी, काँग्रेस, शिवसेनेत प्रमुख लढत
संतोष मिठारी -- कोल्हापूर--शासकीय कार्यालयांसह उच्चभ्रू लोकांची वसाहत, अशी ओळख असलेल्या ताराबाई पार्क प्रभागात ‘ओबीसी पुरुष’ असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे अन्य प्रभागांच्या तुलनेत येथे इच्छुकांची संख्या कमी आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी राजकीय पक्षांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागत आहे. यावेळी येथून माजी नगरसेवक नीलेश देसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.बदललेल्या प्रभाग रचनेत ‘ताराबाई पार्क’मध्ये पूर्वी असलेला सदर बाजार, वृषाली हॉटेल परिसर बाजूला गेला आहे. त्याऐवजी राष्ट्रवादी कार्यालय, डफळे बंगला असा परिसर नव्याने जोडला गेला आहे. त्यामुळे या प्रभागात उच्चभ्रू आणि सुशिक्षित लोकवस्तीचा अधिकतर सहभाग झाला आहे. येथील मतदारसंख्या सुमारे ६००० आहे. गेल्या १५ वर्षांपासून या प्रभागाचे प्रतिनिधित्व देसाई कुटुंबीय करीत आहेत. १९९५ मध्ये या प्रभागातून शिवसेनेचे संजय पवार निवडून आले होते. सन २००२ मध्ये नीलेश देसाई हे अपक्ष म्हणून निवडून आले. या कालावधीत ते महापालिकेचे शिक्षण सभापती म्हणून कार्यरत होते. त्यानंतर २००६ मध्ये पुन्हा देसाई यांनी बाजी मारली. सन २०१०च्या निवडणुकीत प्रभागात महिला आरक्षण पडल्याने देसाई यांच्या पत्नी पल्लवी यांनी निवडणूक लढविली. यात त्या विजयी झाल्या.
देसाई यांच्यासोबतच शिवसेनेकडून उपशहरप्रमुख राजू भोरी, युवा सेना शहरप्रमुख योगेंद्र माने यांनी तयारी सुरू केली आहे. तसेच वासीम मुजावर हे काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी करीत आहेत. ते न्यू शाहूपुरी फें्रड्स सर्कल व एनएसएफसी फुटबॉल क्लबच्या माध्यमातून प्रभागात कार्यरत आहेत. शिवाय महेश जाधव, चंद्रकांत राऊत यांची नावे देखील चर्चेत आहेत. सध्या इच्छुक असलेल्यांपैकी राजू भोरी आणि वासीम मुजावर यांचे जातीचे दाखले आहेत. मात्र, नीलेश देसाई व योगेंद्र माने हे कुणबी दाखला मिळविण्याच्या प्रक्रियेत आहेत. ओबीसी पुरुष असे आरक्षण असल्याने दाखला काढून या प्रभागात लढण्यापेक्षा सोयीस्कर ठरणारे आरक्षण असलेल्या प्रभागाचा काहीजणांनी पर्याय निवडला आहे. या आरक्षणामुळे संबंधित इच्छुकांची प्रभागात चर्चा सुरू आहे. दहा वर्षे प्रभागाचे प्रतिनिधित्व केल्यामुळे नीलेश देसाई प्रभागात परिचित असून, त्यांचा चांगला संपर्क आहे. देसाई वगळता अन्य पाच इच्छुक नवे चेहरे आहेत. भोरी आणि माने यांचा संपर्क आहे. तसेच मुजावर यांचा प्रभागात संपर्क आहे. त्यामुळे ताराराणी आघाडी, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात याठिकाणी लढत रंगणार, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.
असा आहे प्रभाग...
एक्साईज आॅफिस, टेलिफोन आॅफिस, पी.डब्ल्यू.डी. आॅफिस, ताराबाई गार्डन, रूबी अपार्टमेंट, पायशेट्टी किराणा दुकान, कृपलाणी हॉस्पिटल, कमला विनायक अपार्टमेंट, डफळे बंगला, राष्ट्रवादी कार्यालय, अंशिता क्लिनिक, शिवदर्शन बिल्डिंग, पितळी गणपती.
यावेळी प्रभागात ‘ओबीसी पुरुष’ असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे काही इच्छुकांनी कुणबी दाखला मिळवून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यात माजी नगरसेवक नीलेश देसाई हे गेल्या १५ वर्षांत प्रभागात केलेल्या कामाच्या शिदोरीवर ताराराणी आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील अनेकांना आपला मोर्चा सोईस्कर ठिकाणी वळवला आहे..
ताराबाई पार्क--प्रभाग क्र. ११