उमेदवारांची धांदल... पक्ष मात्र थंडच-रणांगण लोकसभेचे : जागावाटपाच्या तिढ्याने सावध प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:19 AM2019-02-28T00:19:45+5:302019-02-28T00:21:29+5:30
कोल्हापूर : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असली तरी कोल्हापुरात मात्र पक्षीय पातळीवर हालचाली अद्याप थंडच आहेत. ...
कोल्हापूर : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असली तरी कोल्हापुरात मात्र पक्षीय पातळीवर हालचाली अद्याप थंडच आहेत. जागावाटपाबरोबरच ऐनवेळी उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यताही वर्तविली जात असल्याने इच्छुकांनी सावध प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे उमेदवारांची धांदल दिसत असली तरी पक्ष बाजूला ठेवूनच प्रचाराची यंत्रणा सक्रिय केल्याचे दिसते.
कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेसची आघाडी आणि शिवसेना-भाजपची युती निश्चित झाली आणि बहुतांश उमेदवारांना सिग्नल मिळाल्याने ते प्रचाराला लागले आहेत. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांच्या जागावाटपात काहीसा तिढा निर्माण झाल्याने पक्षीय हालचाली फार गतिमान दिसत नाहीत. आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे आहे. येथून धनंजय महाडिक यांनाच उमेदवारी मिळणार असल्याने त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असली तरी तो आपल्याकडे घेण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली आहेत. जागा सोडली नाही तर मग उमेदवार आमच्या पसंतीचा दिल्यास निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ, असा प्रयत्न पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा असू शकतो.
तशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. महाडिक यांना शिवसेनेची उमेदवारी देऊन शिवसेना, भाजप आणि महाडिक गटाची सगळी रसद पाठीशी उभी करून जागा पदरात पाडून घेण्याची खेळी ऐनवेळी होऊ शकते. उद्धव ठाकरे यांना येथून चेहरा कोण यापेक्षा एक खासदार निवडून आला, हे महत्त्वाचे असल्याने तेही या प्रक्रियेला पाठिंबा देतील, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. सध्या महाडिक यांची तशी कोंडीच आहे. त्यांचे सारे कुटुंब भाजपसोबत असल्याने त्यांना उघड प्रचार करताना मर्यादा येणार असल्याने त्यांना ‘राष्टÑवादी’पेक्षा युतीची उमेदवारीच अधिक सोईस्कर ठरू शकते. असे झाले तर प्रा. संजय मंडलिक यांच्या अडचणी वाढू शकतात. त्यांना हातात घड्याळ बांधून रिंगणात उतरावे लागेल. दोन्ही कॉँग्रेसची सगळी ताकद त्यांना मिळू शकते, त्याचबरोबर आमदार सतेज पाटील हे प्रतिष्ठा पणाला लावतील.
‘हातकणंगले’मध्येही राष्टÑवादीने ही जागा ‘स्वाभिमानी’ला सोडली आहे; पण त्यांच्या आघाडीचे घोडे ‘बुलढाणा’ व ‘वर्धा’ या जागांवर अडले आहे. ही जागा युतीत शिवसेनेकडे असली तरी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत गेले सहा महिने तयारी करीत आहेत. मध्यंतरी धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारीवर दावा केला आहे. प्रवेश करताना माने यांना उमेदवारीचा शब्द दिल्याचे बोलले जाते; पण खासदार राजू शेट्टींना घेरण्यासाठी शेवटच्या क्षणाला युतीचे नेते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात.
एकूणच, शह-काटशहाचे राजकारण पाहता आता पक्षांच्या संभाव्य उमेदवारांचे उद्या चेहरे बदलले तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे इच्छुकांनी पक्ष बाजूला ठेवूनच प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे.
पालकमंत्र्यांच्या सूचक वक्तव्याचे पडसाद
भीमा कृषी प्रदर्शनात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधाने केली होती. ‘सैराट’मधील उदाहरण सांगत, महाडिक यांनी मनाविरुद्ध लग्न केले तरी त्यांच्यावरच प्रेम राहणार, असे म्हणून राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते, अशी पुष्टीही मंत्री पाटील यांनी जोडली होती. त्यानुसारच सध्या युतीमध्ये हालचाली दिसत आहेत.
शिवसेना नेते ‘मातोश्री’वर
आज तातडीची बैठक : रणणितीबाबत उद्धव ठाकरे चर्चा करणार
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांंना तातडीने आज, गुरुवारी ‘मातोश्री’वरून बोलावणे आले आहे. स्वत: उध्दव ठाकरे हे दुपारी १२ वाजता या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका घ्याव्यात का? याबाबतही चर्चा होऊ शकते. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने हेही मुंबईला जाणार असून, या बैठकीत उमेदवारीवर निर्णय होण्याची शक्यता असल्याने शिवसैनिकांच्या नजरा या बैठकीकडे लागल्या आहेत.
जिल्ह्यातील ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत. शिवसेनेच्या वतीने अनुक्रमे प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मंडलिक यांच्या उमेदवारीची घोषणा आतापर्यंत तीन मंत्र्यांनी केली आहे. शिवसेना-भाजप युतीच्या अगोदर या दोघांनीही प्रचार सुरू केला आहे; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या जागेवर दावा सांगितल्याने इच्छुक उमेदवारांची अडचण झाली आहे. अगोदर जागेवर दावा करायचा परंतु ती मिळत नसेल तर उमेदवार बदलण्याचा पर्याय द्यायचा असा मंत्री पाटील यांचा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मंत्री पाटील यांचा उमेदवार कोण हे जगजाहीरच आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तातडीने ‘मातोश्री’वर बोलावले आहे.
शिवसेनेचे सहाही आमदार, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांसह प्रमुख नेत्यांना बोलावले आहे. त्याचबरोबर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जर लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घेण्याचा निर्णय झाला तर काय करायचे? याबाबत या बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पालकमंत्र्यांनाच मुरगूडला निमंत्रण
कोल्हापूर लोकसभा मतदार संघ आपल्या पक्षाला द्यावा, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रयत्नशील असल्याची चर्चा असताना ४ मार्चला मुरगूडला नगरपालिकेच्यावतीने होणाºया कार्यक्रमाचे निमंत्रण मंत्री पाटील यांनी दिले आहे. परंतु त्यांनी वेळ पाहून सांगतो, असे सांगितले आहे. तिथे अंबाबाई मंदिरातील सभागृहाचा पायाभरणी समारंभ होत आहे. त्यास मंत्री पाटील, संजय मंडलिक, संजय घाटगे व समरजित घाटगे यांना निमंत्रित केले आहे.