उमेदवारांचे मांडव सजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:58 AM2019-03-11T00:58:33+5:302019-03-11T00:58:38+5:30
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताक्षणी उमेदवारांची पळापळ सुरू झाली आहे. उमेदवारांनी आपापल्या कार्यालयांसमोर मांडव घालून ठेवले आहेत. जिल्ह्यातील ...
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताक्षणी उमेदवारांची पळापळ सुरू झाली आहे. उमेदवारांनी आपापल्या कार्यालयांसमोर मांडव घालून ठेवले आहेत. जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्हीही लोकसभा मतदारसंघांत पक्षापेक्षा व्यक्तीला महत्त्व असल्याने त्या दृष्टीनेच उमेदवारांनी आपले घर हेच निवडणुकीचे अधिकृत प्रचार कार्यालय केले आहे. पक्ष कार्यालय शांत असले तरी वैयक्तिक कार्यालयांतील लगबग मात्र वाढीस लागली आहे. मांडवात बसण्यासाठी खुर्च्यांपासून ते चहापाण्यासह जेवणाची सोय करण्याचे कामही वेगात सुरू आहे.
राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक हेच यावेळी पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत; पण त्यांची सर्व सूत्रे राष्ट्रवादीच्या शहर व जिल्हा कार्यालयाऐवजी राजेश मोटर्स येथील गॅरेजवरील महाडिकांच्या अधिकृत कार्यालयातून हलू लागली आहेत. तेथेच मोठा मंडप उभारण्यात आला असून, राष्ट्रवादी पक्षाच्या झेंड्याची पार्श्वभूमी असलेले व्यासपीठही तयार करण्यात आले आहे.
प्रा. संजय मंडलिक हे शिवसेनेचे उमेदवार आहेत; पण त्यांचे प्रचार कार्यालय रुईकर कॉलनीतील घरातच थाटण्यात आले आहे. भगव्या रंगाचे कापड वापरून बंगल्याच्या समोरच लॉनवर मंडप उभारण्यात आला आहे. तेथेच व्यासपीठासह बसण्यासाठी खुर्च्या अंथरण्यात आल्या आहेत. चहापाण्याची सोयही येथेच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हातकणंगले मतदारसंघातील खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचे कार्यालय कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे; पण त्यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे जयसिंगपूरमधील त्यांच्या घरातूनच हलणार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून धैर्यशील माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी अजून प्रचार कार्यालय सुरू केले नसले तरी सध्या तरी रुईकर कॉलनीतील त्यांच्या बंगल्यातूनच सूत्रे हलविली जात असल्याचे सांगण्यात आले.
यावेळची निवडणूक ही पक्षापेक्षा व्यक्तिगत स्वरूपाची जास्त दिसत असल्याने उमेदवार असणाऱ्या नेत्याला खूप महत्त्व आले आहे. त्यामुळे पक्षाच्या मूळच्या कार्यकर्त्यांपेक्षा उमेदवार नेत्यांच्या जवळच्या माणसांनी प्रचार कार्यालयांचा ताबा आपल्याकडे घेतल्याचेच आतापासून दिसत आहे. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस व भाजप या पक्षांकडे या दोन्हीही मतदारसंघांतील उमेदवारी नसल्याने त्यांच्या कार्यालयात निवडणुकीच्या कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. नेते, कार्यकर्ते सध्या तरी निवांत दिसत आहेत.