सरवडेत आरक्षणामुळे उमेदवारांचा शोध

By admin | Published: January 4, 2017 11:37 PM2017-01-04T23:37:33+5:302017-01-04T23:37:33+5:30

जनता दल, शिवसेना यांची भूमिका निर्णायक : ए. वाय. पाटील, विजयसिंह मोरे यांच्या गटांत कडवी झुंज

Candidates' research due to Sarvadeet Reservation | सरवडेत आरक्षणामुळे उमेदवारांचा शोध

सरवडेत आरक्षणामुळे उमेदवारांचा शोध

Next

दत्ता लोकरे --सरवडे --बंडखोरीच्या परंपरेला यश देणारा आणि गेली अनेक वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्व प्राप्त झालेला सरवडे जिल्हा परिषद हा मतदारसंघ या निवडणुकीत इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे यांच्या दांड्या उडाल्या असून, आरक्षित उमेदवार शोधताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. होऊ घातलेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीची राजकीय गणिते या लढतीत असल्याने कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुन्हा एकदा या मतदारसंघात ए. वाय. पाटील आणि विजयसिंह मोरे यांच्या गटांत कडवी झुंज दिसून येणार आहे. आघाडीची रचना असल्याने जनता दल, शिवसेना यांच्या भूमिका निर्णायक ठरणार असून, पहिल्यांदाच भाजप उमेदवाराच्या शोधात आहे.
राधानगरी तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या या मतदारसंघात निवडणुका प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या झाल्या आहेत. या मतदारसंघात सरवडे व सोळांकूर असे दोन पंचायत समिती मतदारसंघ आहेत. सरवडे, सोळांकूर, नरतवडे, आदी मोठी गावे, वाड्या-वस्त्या अशा २६ गावांचा या मतदारसंघात समावेश आहे, तर ४१ हजार मतदार आहेत.
गत पंचवार्षिकमधील प्रतिनिधित्व वगळता सरवडे गावातील व्यक्तींनी जि.प.चे प्रतिनिधित्व केले आहे. गतवेळच्या निवडणुकीत हा मतदारसंघ खुला झाल्याने सरवडे जि. प.च्या उमेदवारांच्या अध्यक्षपदासाठीच्या भुवया उंचावल्या. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील व विजयसिंह मोरे यांच्यात काटा लढत झाली, तर शिवसेनेचे के. के. राजिगरे व अपक्ष सोनाबाई लोकरे यांनी उमेदवारी केली. मोरे-पाटील लढतीत पाटील विजयी झाले.
सरवडे पं. स. मतदारसंघ हा
गत पंचवार्षिकमध्ये इतर मागासवर्गीयसाठी आरक्षित होता. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या कविता अमरसिंह पाटील व काँग्रेसच्या पाठिंब्यावर साताप्पा गुरव यांच्यात लढत झाली. यामध्ये कविता पाटील विजयी झाल्या, तर फराळे मतदारसंघात काँग्रेसच्या गायत्रीदेवी नंदकिशोर सूर्यवंशी व जनता दल, राष्ट्रवादी युतीच्या सुमन बबन पाटील यांच्यात झालेल्या लढतीत सूर्यवंशी विजयी झाल्या. निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी पं. स.मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आघाड्या एकत्र आल्याने पाटील, सूर्यवंशी या मतदारसंघातील दोन्हीही सदस्यांना सभापतिपदाचा मान मिळाला.
या मतदारसंघाची यापूर्वी वेळोवेळी पुनर्रचना झाल्याने मोठे बदल होत गेले.
या मतदारसंघातीलच कै. शंकरराव पाटील यांनी अकरा वर्षे जि. प.चे अध्यक्षपद, तर नामदेवराव भोईटे यांनी पं. स.चे सभापतिपद भूषविले आहे. सध्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे प्रतिनिधित्व करीत असून, या मतदारसंघातून बापू बाळा पाटील, माजी आमदार किसनराव मोरे, शंकरराव पाटील-कौलवकर, नामदेवराव भोईटे, बिद्री कारखान्याच्या पहिल्या संचालिका पार्वतीबाई किसनराव मोरे, राजेंद्र पांडुरंग पाटील, अपर्णा अरविंद मानकर, अंजना प्रकाश खोराटे यांनी प्रतिनिधित्व केले. सरवडे पं.स.मध्ये आतापर्यंत विठ्ठलराव खोराटे, एम. डी. पाटील, आर. के. मोरे, सुनीता मगदूम यांनी, तर फराळेमधून ज्ञानदेव पाटील, मारुती कलिकते, सुकुमार रेवडेकर, निवास परीट यांनी प्रतिनिधित्व केले. सरवडे पं. स. गण सर्वसाधारण महिलेसाठी, तर सोळांकूर पंचायत समिती गण इतर मागासवर्र्गीय पुरुषसाठी आरक्षित झाला आहे. नेत्यांच्याकडे इच्छुक उमेदवारीचा
दावा करीत निष्ठावंत असल्याचा निर्वाळा करीत आहेत, तर काही ठिकाणी जि. प.ला उमेदवारी नको, पण बिद्रीच्या उमेदवारीचा शब्द द्या, अशी भूमिकाही मांडली जात आहे. सध्या मतदारसंघात जनता दल राष्ट्रवादीबरोबर आहे. मात्र, जिल्हा परिषद व बिद्री कारखाना निवडणूक संबंधी बैठक घेऊन आपण निर्णय घेणार असल्याचे खोराटे यांनी सांगितले. शिवसेनेने या मतदारसंघांत निवडणुकीसाठी सामोरे जाण्याची तयारी केली असून, शिवसेना उपतालुकाप्रमुख के. के. राजिगरे यांच्या पत्नी व सरवडे ग्रा. पं.च्या सदस्य रेश्मा राजिगरे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, तर भाजपने शाखा काढत आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातूनच माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीच्या माध्यमातून हालचाली गतिमान होत असून, सरवडे पंचायत समितीमधून शीतल शरद पाटील या इच्छुक असल्याचे बोलले जाते. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या मतदारसंघांत राजकीय बदलाचे संदर्भ, आगामी बिद्रीचे कुरूक्षेत्र या पार्श्वभूमीवर रंगतदार लढत होणार असून, कोण सरस होणार हे निकालानंतर स्पष्ट
होणार आहे.


इच्छुकांची नावे
सरवडे जि. प. : सविता शिवाजी चौगले-पंडेवाडी, कमल शामराव कुंभार-सरवडे, ज्योती सचिन जाधव-सोळांकूर, मीनल धोंडिराम पाटील-मोघर्डे, शीतल दिनकर सुतार- आकनूर. कविता अमरसिंह पाटील-सरवडे, नीता नेताजी पाटील-मांगोली, रूक्मिणी लक्ष्मण कुंभार-सोळांकूर.
सरवडे पं. स. : सुनीता सुभाष पाटील-मालवे, सुजाता राजेंद्र पाटील-नरतवडे, कल्पना बबन चौगले-आकनूर, देवयानी दत्तात्रय पाटील-मांगोली, कल्पना राजेंद्र मोरे-सरवडे, कविता अमरसिंह पाटील-सरवडे, नीता नेताजी पाटील-मांगोली, लता एकनाथ पाटील-आकनूर, सरस्वती रामराजे पाटील व सविता मानसिंग पाटील-सरवडे.
सोळांकूर पं. स. : तुकाराम परीट व कुमार शिंदे-पनोरी, दिनकर सुतार-सावर्डे, शामराव मिरजकर व रसुल मुल्लाणी-पंडेवाडी, सरस्वती सात्ताप्पा गुरव-सोळंबी, रुक्मिणी लक्ष्मण कुंभार-सोळांकूर, स्वाती अशोक नायकवडी- पंडेवाडी, शीतल सर्जेराव काशीद-सावर्डे पा.


मतदारसंघात बलाबल काठावर
या मतदारसंघात ५३०० असे सर्वाधिक मतदार असलेले सरवडे गाव निवडणुकींचा नूर पालटते. येथे ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे विरुद्ध मामा-भाचे असे राजकीय समीकरण आहे. ग्रा.पं.मध्ये मामा जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे व भाचे ‘बिद्री’चे माजी संचालक, माजी जि. प. सदस्य राजेंद्र पाटील यांच्यात काटा लढत होते. सध्या मामा-भाचे गटाने आठ जागा जिंकून सत्ता स्थापन केली आहे, तर मोरे गटाला सात जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बलाबल काठावर आहे.
२००७ च्या निवडणुकीत राजेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. २०१२ च्या निवडणुकीत पाटील हे राष्ट्रवादीबरोबर राहिले. त्यावेळी राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील विजयी झाले. आगामी बिद्री कारखान्याच्या पार्श्वभूमीवर जि. प. निवडणूक राष्ट्रवादी व काँग्रेस यांना महत्त्वाची असून, राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील (दादा) हेच किंगमेकर असतील, असे बोलले जाते.


या मतदारसंघात काँग्रेसचे विजयसिंह मोरे व शिवसेनेचे के. के. राजिगरे यांनी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचा प्रचार केला. त्यामुळे या निवडणुकीत आमदारांची मोठी गोची होणार आहे.


सरवडे जि. प.साठी गावे : २६
मतदार : ३९,१८६
सरवडे पं. स. गावे : ११
मतदार : २०,९७१
फराळे पं. स. गावे : १५
मतदार : १८,३९५

Web Title: Candidates' research due to Sarvadeet Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.