कागदाच्या गुंडाळीत उमेदवारांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:32 AM2020-12-30T04:32:28+5:302020-12-30T04:32:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज, बुधवार अखेरचा दिवस असल्याने मंगळवारी एकच झुंबड ...

Candidates suffocated in a roll of paper | कागदाच्या गुंडाळीत उमेदवारांची दमछाक

कागदाच्या गुंडाळीत उमेदवारांची दमछाक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज, बुधवार अखेरचा दिवस असल्याने मंगळवारी एकच झुंबड उडाली होती. एका अर्जासोबत तब्बल २० कागदपत्रे जोडावी लागत असल्याने त्याच्या पडताळणीस विलंब लागतो. त्यामुळे एका उमेदवाराला किमान २० ते २५ मिनिटांचा वेळ लागत असल्याने विहीत वेळेत अर्ज दाखल करताना दमछाक उडताना दिसत होती.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर शुक्रवार ते रविवार सलग तीन दिवस सुटी असल्याने सोमवारपासून पुन्हा गती आली. ऑनलाईन अर्ज भरून त्याच्या प्रतीसोबत दाखल्यांसह इतर कागदपत्रे जोडावी लागत आहेत. सुट्यांमुळे कागदपत्रांची उपलब्धता करण्यात साेमवारचा दिवस गेल्याने मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती.

सकाळी दहापासूनच आघाड्यांचे नेते आपआपल्या उमेदवारांना घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी येत होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची तपासणी करावी लागते. कार्यालयाबाहेर बसूनच कागदपत्रांची जुळवाजुळव केली जायची आणि मग अधिकाऱ्यांकडे दाखल केला जायचा. दोन ठिकाणी तपासणी करूनच संबंधित यंत्रणा अर्ज स्वीकारत होती. सगळी प्रक्रिया पूर्ण करून परिपूर्ण अर्ज दाखल करण्यास २० ते २५ मिनिटांचा अवधी लागत असल्याने गर्दी झाली होती.

सर्व्हर डाऊनमुळे रात्रभर जागरण

ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रत घेऊन अर्ज दाखल करायचे आहेत. त्यामुळे सोमवारी रात्री नेटकॅफेमधून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. त्यात सर्व्हर डाऊन झाल्याने रात्रभर जागरण करावे लागल्याच्या तक्रारी उमेदवार करत होते.

धक्कातंत्राचा वापर

उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत कुरघोड्यांचे राजकारण सुरू होते. रात्री मी तुमच्यासोबतच आहे, म्हणून सांगणारे दुसऱ्यादिवशी अर्ज दाखल करताना विरोधी गटासोबत राहिल्याने गटनेते अस्वस्थ दिसत होते. अनेक गावांत धक्कातंत्राचा वापर पाहावयास मिळाला.

वडा-पाववर ताव

सकाळी उठल्यापासूनच कागदपत्रे गोळा करून अर्ज स्वीकारणाऱ्या ठिकाणी येईपर्यंत उमेदवारांची दमछाक उडत होती. त्यात तिथे आल्यावरही वेळ लागत असल्याने मिळेल तिथे बसून उमेदवारांसह समर्थक वडा-पाववर ताव मारताना दिसत होते.

Web Title: Candidates suffocated in a roll of paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.