उमेदवारांना भरावा लागणार आॅनलाईन अर्ज

By admin | Published: October 1, 2015 12:16 AM2015-10-01T00:16:35+5:302015-10-01T00:40:51+5:30

निवडणूक तीन लाखांतच : यंदा ‘नोटा’चा वापर होणार; वेळेत खर्च सादर न करणारा उमेदवार निवडून आला तरी तीन वर्षे ‘अनर्ह’च

Candidates will have to fill online application | उमेदवारांना भरावा लागणार आॅनलाईन अर्ज

उमेदवारांना भरावा लागणार आॅनलाईन अर्ज

Next

कोल्हापूर : महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरावा लागणार असून, हा अर्ज ६ ते १३ आॅक्टोबरअखेर केव्हाही भरता येईल. अर्जांची प्रिंट आणि योग्य ती कागदपत्रे त्या-त्या विभागानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागणार आहेत. याशिवाय निवडणुकीसाठी तीन लाख रुपयेच खर्चाची मर्यादा घातली असून, लायक उमेदवार नसल्यास मतदार प्रथमच ‘नोटा’चा वापर करू शकतात. यासह अन्य आदर्श आचारसंहितेची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी पक्ष, आघाड्यांच्या प्रमुखांना दिली.
या सर्वपक्षीय बैठकीत निवडणुकीची नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे सर्व संभाव्य उमेदवारांनी संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेनुसारच अगदी डोळ्यांत तेल घालून भरावी लागणार आहेत. निवडणूक लढविण्यासाठी सर्व परवानग्या ‘एक खिडकी योजने’अंतर्गत दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये अर्ज कसा भरायचा त्याचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. अर्ज ६ ते १३ आॅक्टोबरच्या दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना भरता येणार आहे.
अर्ज भरल्यानंतर योग्य त्या कागदपत्रांसह यादरम्यान त्या-त्या विभागीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हा अर्ज जमा केल्यानंतर उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत मतदारांना प्रथमच उमेदवार लायक नसल्यास ‘नोटा’ अर्थात ‘वरीलपैकी एकही नाही’ या बटणाचा वापर मतदान यंत्रावर करता येणार आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार, स्वाती देशमुख, विद्युत वरखेडकर, शैलेश सूर्यवंशी, बाबासाहेब बेलदार, आचारसंहिता प्रमुख भाऊसाहेब गलांडे, साहाय्यक निवडणूक अधिकारी दिलीप सावंत, मनिषा देशपांडे, उपायुक्त विजय खोराटे, साहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, साहाय्यक संचालक धनंजय खोत, उपविभागीय पोलीस अधिकारी भारतकुमार राणे, अनिल पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आर. के. पोवार, जनसुराज्य पक्षाचे प्रा.जयंत पाटील, ताराराणी आघाडीचे सुनील कदम, बहुजन समाज पार्टीचे अजय कुरणे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रकांत यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शिवाजी शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे मोहन पाटील, जनता दल (युनायटेड) बजरंग शेलार, राष्ट्रीय समाज पक्षाचे रतन बाणदार, लोकशक्ती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी हजर होते. (प्रतिनिधी)


आचारसंहितेतील प्रमुख मुद्दे, सर्व परवानग्या ‘एक खिडकी योजने’अंतर्गत


आचारसंहितेतील प्रमुख मुद्दे, सर्व परवानग्या ‘एक खिडकी योजने’अंतर्गत
सर्वसाधारण प्रभागासाठी ५,०००, तर राखीव प्रभागासाठी अनामत रक्कम
रु. २,५०० इतकी राहणार.
नामनिर्देशनपत्र, शपथपत्र, आवश्यक प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती, पक्षाची उमेदवारी असल्यास जोडपत्र १, २ द्यावे लागणार.
अर्ज महाआॅनलाईनच्या मदतीने ँ३३स्र:/ स्रंल्लूँं८ं३ी’ीू३्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर भरता येणार आहे.
पक्षाची उमेदवारी असल्यास जोडपत्र आणि कागदपत्रे स्वत: निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागणार आहेत.
राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. ते नसल्यास पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावा लागणार आहे. हे प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत सादर न केल्यास निवड रद्द करण्यात येणार
निवडून आलेल्या उमेदवारांना निकालानंतर ३० दिवसांत खर्चाचा तपशील आयुक्त किंवा उपाआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार.
विजयी उमेदवाराने निवडणूक खर्चाचा तपशील निर्धारित वेळेत सादर न केल्यास त्याचे पालिका सदस्यत्व तीन वर्षांसाठी ‘अनर्ह’ होऊ शकते.
नोंदणीकृत राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवत असल्यास नामनिर्देशनपत्रात उल्लेख आवश्यक.
उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे, त्या प्रभागातीलच प्रस्तावक (सूचक), अनुमोदक हवा.
एका उमेदवाराला चार नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील.
नामनिर्देशपत्र ६ ते १३ आॅक्टोबरच्यादरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार.
निवडणुकीकरता उमेदवारांना स्वतंत्र बँक खात्याद्वारेच निवडणुकीत खर्च करणे बंधनकारक आहे.
आचारसंहिता काळात मतदार प्रभावीत होतील असे निर्णय पक्ष/आघाड्यांना घेता येणार नाही.
सभेसाठी महापालिकेची मैदाने अग्रक्रमानुसार उपलब्ध केली जातील.
पक्ष, स्थानिक आघाड्यांना ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ मुख्य निवडणूक कार्यालयांतून घ्यावी लागणार.
प्रचारात वापर करण्यात येणाऱ्या वाहनांची परवानगी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून आवश्यक. गाडी भाड्याचा खर्च तपशिलात आवश्यक.
निवडणूक कार्यालयांना परवानगी देताना जागामालकांचे संमतीपत्र, जागेचा घरफाळा नसल्याचा दाखला, भाड्याच्या रकमेचा तपशील आवश्यक .
सभेसाठी जागेची परवानगी देताना जागा मनपाची असल्यास वॉर्ड आॅफिसरचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक.
पोस्टर्स, इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रसारित होणारे साहित्य एमसीएमसी या समितीसमोर सादर करणे गरजेचे.
जाहीर प्रचाराचा कालावधी मतदान समाप्तीच्या ४८ तास अगोदर अर्थात ३० आॅक्टोबर २०१५ च्या सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत राहणार आहे.
प्रचार फेरीत तीनच वाहने वापरता येणार.
ध्वनिक्षेपक सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वापरण्यास मुभा.
पक्षाची प्रचारफेरी असल्यास त्याचा खर्च त्या पक्षाच्या सर्व उमेदवारांवर विभागून टाकला जाणार आहे.

Web Title: Candidates will have to fill online application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.