‘गोकुळ’साठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:24 AM2021-03-25T04:24:09+5:302021-03-25T04:24:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीचा बिगुल वाजला असून, उद्या (गुरुवार) पासून उमेदवारी अर्ज विक्री व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीचा बिगुल वाजला असून, उद्या (गुरुवार) पासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यास सुरुवात होत आहे. करवीर प्रांताधिकारी कार्यालयात ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रतिज्ञापत्रासह पंचकमिटी सदस्य असल्याच्या दाखल्यासह विविध कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहणार आहे.
‘गोकुळ’च्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. करवीर प्रांताधिकारी कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज विक्री व स्वीकृती होणार आहे. नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवाराने प्रतिज्ञापत्र, पंचकमिटी सदस्य असल्याचा दाखला, ‘गोकुळ’ दूध संघाचा संस्था थकबाकीदार नसल्याचा दाखला आदी जोडावे लागणार आहे. १ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
नामनिर्देशन दाखल करताना हे लागणार
नामनिर्देशन पत्रात दिलेल्या माहितीबाबत प्रतिज्ञापत्र
संस्थेच्या पंचकमिटी सदस्य असल्याचा दाखला
संस्था ऑडिट वर्ग ‘अ’ किंवा ‘ब’ वर्ग असल्याचे प्रमाणपत्र
राखीव गटातील उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित सत्य प्रत जोडणे आवश्यक आहे.
उमेदवार व सूचकांचे आधारकार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा वाहन परवाना आदींपैकी एक साक्षांकित सत्य प्रत जोडणे आवश्यक आहे.
तीन पासपोर्ट आकाराचे फोटो
स्वतंत्र बँक खाते उघडणे
ठरावधारकालाच नामनिर्देशनपत्र मिळणार
‘गोकुळ’साठी नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्वीकारण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. ज्यांचे नाव मतदार यादीत आहे, त्यांच्या नावावरच नामनिर्देशनपत्र दिले जाणार आहे.
शेवटच्या दोन दिवसांतच उडणार झुंबड
आजपासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी तोंडावर होळी असल्याने पहिल्या दोन दिवसांत कोणी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची शक्यता कमी आहे. त्यात शनिवार ते सोमवार शासकीय सुटी असल्याने मंगळवार (दि. ३०) पासूनच नामनिर्देशन दाखल होण्यास सुरुवात होईल. बुधवार (दि. ३१) व गुरुवारी (दि. १ एप्रिल) झुंबड उडणार आहे.
उमेदवारांना दोन लाख खर्चाची मर्यादा
उमेदवारांना निवडणूक खर्च मर्यादा दोन लाखांची आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत खर्चाचा हिशोब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे.