उमेदवारीवरून ‘ताराराणी’च्याच आजी-माजी नगरसेवकांत रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:28 AM2021-01-16T04:28:13+5:302021-01-16T04:28:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापुरातील सर्वात श्रीमंत वस्ती असा नावलौकिक आणि सर्वात कमी मतदान असा बदलौकिक असलेला ताराबाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापुरातील सर्वात श्रीमंत वस्ती असा नावलौकिक आणि सर्वात कमी मतदान असा बदलौकिक असलेला ताराबाई पार्क हा प्रभाग गेली १५ वर्षे ताराराणी आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे पोटनिवडणूक व पाच वर्षात दोन नगरसेवक दिलेला हा प्रभाग महिला राखीव झाल्याने इच्छुकांच्या उड्या पडल्या आहेत. ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर व नीलेश देसाई या आजी-माजी नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून घरातच उमेदवारी ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे. बालेकिल्ला भेदण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीकडून सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादीकडून सूरमंजिरी लाटकर व काँग्रेसकडून दीपाली घाटगे यांची चाचपणी सुरू आहे.
न्यू शाहूपुरीतील अर्धा भाग व उर्वरित ताराबाई पार्क असा मिळून हा प्रभाग बनला आहे. न्यू शाहूपुरी चर्च, अर्बन बॅंक, धैर्यप्रसाद हॉल, पितळी गणपती, पर्ल हॉटेल, ताराबाई गार्डन असा हा प्रभाग पसरलेला आहे. एकूण ५ हजार २३४ मतदारांपैकी मुस्लिम, सिंधी, ख्रिश्चन यांचे मतदान १३०० च्या वर आहे. बऱ्यापैकी संमिश्र असा हा प्रभाग निम्मा उच्चभ्रू आणि निम्मा बाराबलुतेदारांचा आहे. त्यामुळे येथील विकासाची व राजकीय समीकरणेही वेगवेगळी आहेत. विशेष म्हणजे इतक्या स्थानिक नागरिकांमध्ये विकासाच्या प्रश्नाविषयी फारशी आस्था दिसत नाही.
हा प्रभाग गेल्या निवडणुकीत ओबीसी होता. नीलेश देसाई हे ताराराणीकडून १९११ मतांनी एकतर्फी विजयी झाले होते. तथापि त्यांचा दाखला उच्च न्यायालयात अवैध ठरल्याने अडीच वर्षांनी येथे पोटनिवडणूक लागली. यावेळी ताराराणीकडून रत्नेश शिरोळकर यांनी निवडणूक लढवली आणि १३९९ मते घेऊन विजयी झाले. यावेळी राष्ट्रवादीकडून राजू लाटकर यांनी निवडणूक लढवत ११९९ अशी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. राष्ट्रवादीने पहिल्यांदाच येथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मते घेतली.
आता हा प्रभाग सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने येथे आजी नगरसेवकांचा पत्ता कट झाला आहे. पोटनिवडणुकीत ताराराणीकडून विजयी झालेले विद्यमान नगरसेवक रत्नेश शिरोळक़र यांनी, गेली तीन वर्षे केलेल्या कामांच्या जोरावर ताराराणी भाजप आघाडी आपल्यालाच उमेदवारी देईल असे समजून तयारी सुरू केली आहे. पत्नी स्वरूपा शिरोळकर यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. मिळाली नाही तर अपक्ष म्हणून लढण्याचीही तयारी केली आहे. ताराराणीकडून माजी नगरसेवक नीलेश देसाई यांनी पल्लवी देसाई यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. पोटनिवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले राष्ट्रवादीचे राजू लाटकर यांनी पत्नी व माजी महापौर ॲड. सूरमंजिरी लाटकर यांच्यासाठी येथे चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेसनेही भागातील सक्रिय कार्यकर्ते असलेले संजय घाटगे वंदूरकर यांनी दीपाली घाटगे यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. गेली पाच वर्षे ते विविध विकास कामांच्या माध्यमातून प्रभागात तयारी करत आहेत.
प्रभागात झालेेली कामे...
न्यू शाहूपुरीत ड्रेनेज लाईनचे मोठे काम पूर्ण
जुन्या टाकीच्या दुरुस्तीसह नवीन पाण्याची टाकी बसवली
ताराबाई गार्डनमध्ये ओपन हॉलचे महत्त्वपूर्ण काम
सासने विद्यालयाचे अद्ययावतीकरण पूर्ण
प्रभागात न झालेली कामे...
सासणे ग्राऊंडचा विकास झालेला नाही, त्यामुळे मैदानाला बकालपणा आला आहे.
कचरा उठावाचा प्रश्न गंभीर आहे.
सीसीटीव्ही नाहीत
प्रभागाचे विद्यमान नगरसेवक : रत्नेश शिरोळकर (ताराराणी आघाडी)
आताचे आरक्षण : सर्वसाधारण महिला
एकूण मतदान ५२३४
निवडणुकीत मिळालेली मते : नीलेश देसाई : १९११ (ताराराणी)
वासीम मुजावर : ६४३ (काँग्रेस)
पाेटनिवडणुकीत मिळालेली मते :
रत्नेश शिरोळकर : १३९९ (ताराराणी)
राजू लाटकर : ११९९ (राष्ट्रवादी)
प्रतिक्रिया
तीन वर्षाचा कमी अवधी मिळाला तरी तात्पुरत्या कामाऐवजी कायमस्वरूपी कामांवर जास्त भर दिला. रस्ते, पाणी, ड्रेनेजबरोबरच घरफाळा आकारणीचा शहरातील महत्त्वाचा प्रश्न सातत्याने पाठपुरावा करून सोडवला.
- रत्नेश शिरोळकर,
विद्यमान नगरसेवक, ताराबाई पार्क
फोटो: १५०१२०२१-कोल-सासणे ग्राऊंड ०१, ०२
फोटो ओळ: ताराबाई पार्कातील सासने ग्राऊंडच्या विकासाचा आराखडा तयार केला, पण गेली पाच वर्षे त्याची अंमलबजावणीच झालेली नसल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावर असलेल्या या मैदानाला अवकळा आली आहे. मुले खेळण्याच्या जागेवर आता बकरी साेडली जातात. (छाया : नसीर अत्तार)