मोर्चासाठी युवा पिढी ‘कॅच’
By admin | Published: September 28, 2016 01:01 AM2016-09-28T01:01:32+5:302016-09-28T01:01:32+5:30
युवाशक्तीही एकवटली : मराठा क्रांती मोर्चाची स्टिकर्स दुचाकींवर; महाविद्यालयांतही जनजागृती
कोल्हापूर : १५ आॅक्टोबरला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी विशेषत: युवकांतून जागृती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्टिकर्स, प्रसिद्धिपत्रके, बॅनर, आदी विविध माध्यमांतून महाविद्यालयीन युवकांना या मोर्चात सहभागी करून घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यासाठी युवकांच्या दुचाकी वाहनांवर ‘मराठा’ची स्टिकर्स चिकटवली जात आहेत. ही जबाबदारीही युवा वर्गाकडेच दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयात ‘एक मराठा-लाख मराठा’ इतकीच चर्चा सुरू आहे. त्यातून युवा एकजुटीच्या ऐक्याचे दर्शन घडत आहे.
१५ आॅक्टोबरला कोल्हापूर शहरात काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या तयारीसाठी संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यासाठी व्यापक मेळावे, बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. मोर्चाची आदर्श आचारसंहिता सर्वत्र सांगण्यात येत आहे. ज्येष्ठ मंडळी तसेच तालीम संस्थांमध्ये बैठका घेऊन जाणीवजागृती सुरू आहे. कॉलेज युवक-युवतींनी शाळा, कॉलेजमधून मराठा क्रांती मोर्चाची माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
भावी पिढी असणाऱ्या युवा वर्गाला आपलेसे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, महाविद्यालयीन युवक स्वत:हून या मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी लागला आहे. प्रत्येक महाविद्यालयात जाऊन युवा वर्गात जागृतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
येथील शिवाजी पेठेत श्री शिवाजी तरुण मंडळामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे संपर्क कार्यालय केले आहे. कोल्हापुरात होणाऱ्या मोर्चासाठी जनजागृतीचे प्रयत्न सुरू केले आहेत. गणेशोत्सवामध्ये प्रत्येकजण आपल्या तालीम मंडळाचा अभिमानाने उल्लेख करत होता. त्याचे पडसाद त्या-त्या भागातील महाविद्यालयात दिसून आले होते. त्याचप्रमाणे आता ‘एक मराठा-लाख मराठा’ असा संदेश शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील महाविद्यालयांत घुमत आहे. प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्याने अभिमानाने हा संदेश पुढे देण्याचे काम सुरू ठेवले आहे. महाविद्यालयीन युवकही तितक्याच उत्साहाने या उपक्रमात सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील राजकीय गट-तट बाजूला ठेवून मराठा क्रांती मोर्चासाठी सारी युवा शक्ती एकवटली आहे. युवकांना स्टिकर्स देण्यात आलेली आहेत. महाविद्यालयात ही स्टिकर्स प्रत्येक दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवरही झळकू लागली आहेत.
स्टिकर्स घेण्यासाठी युवकांची झुंबड
प्रत्येक महाविद्यालयात युवकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर पुढे आणि मागेही चिकटवलेली ‘मराठा’ स्टिकर्स झळकत आहेत. महाविद्यालयांत ही स्टिकर्स वाटण्यासाठी युवा पिढीकडे जबाबदारी देण्यात आली आहे. ही स्टिकर्स घेण्यासाठी शिवाजी मंदिरमधील संपर्क कार्यालयात युवकांची झुंबड उडाली आहे.
हॉटेलमध्येही ‘मराठा’ स्टिकर्स
शहरातील मोठमोठ्या हॉटेलमध्येही येणाऱ्या ग्राहकांत मराठा मोर्चाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ‘मराठा क्रांती मोर्चा’ अशी स्टिकर्स हॉटेलमधील भिंतींवर, फ्रीजवर, अक्षरश: रेटकार्डवरही झळकू लागली आहेत.
क्रांती मोर्चाला ‘केप्टा’चा पाठिंबा
कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाला कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनने (केप्टा) पाठिंबा जाहीर केला आहे. कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ‘केप्टा’चे अध्यक्ष प्रा. संजय यादव होते. या बैठकीत मराठा क्रांती मोर्चास पाठिंबा देण्याचे एकमताने ठरविण्यात आले. जिल्ह्यातील सर्व क्लाससंचालकांनी आपले क्लासेस या दिवशी बंद ठेवून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीस असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. बी. एस. पाटील, प्रशांत कासार, संजय वराळे, तानाजी चव्हाण, सुभाष देसाई, दीपक खोत, मोहन गावडे, रंगराव जाधव, अनिल पाटील, आदी उपस्थित होते.
जि. प. कर्मचाऱ्यांची मोर्चाला पाठिंब्यासाठी रॅली
कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी व जनजागरणाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे कर्मचारी आज, बुधवारी दुपारी शहरातून रॅली काढणार आहेत. मुख्यालय व परिसरातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. दुपारी चार वाजता जिल्हा परिषदेच्या नागाळा पार्क येथील कार्यालयासमोरून या रॅलीला सुरुवात होईल. यामध्ये आपल्या दुचाकी आणि चारचाकी घेऊन कर्मचारी सहभागी होणार आहेत. या रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
पट्टणकोडोलीत प्रबोधनात्मक वॉर्ड बैठका
पट्टणकोडोली : १५ आॅक्टोबरला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे प्रबोधनात्मक वॉर्ड बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये २ आॅक्टोबरला गावातून मूक मोर्चा काढून गावसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपार्डी घटनेतील आरोपींना फाशी व्हावी व अॅस्ट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्याविषयी ठराव करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर येथील मोर्चासाठी महिलांसह पाच हजारांपेक्षा अधिक मराठा समाज बांधव येथून सहभागी होणार आहेत. यासाठी अशोक हुपरे, बाळासो खराडे, आण्णा जाधव, गोगा बाणदार, बाजी बाणदार, प्रकाश जाधव, नीलेश कागले, अरुण तिरपणकर, राजू पोवार, सरदार सुरवशी, सतीश हुपरे, सचिन दुर्गे, सचिन शिंदे व अनील तोडकर परिश्रम घेत आहेत.
मराठा मोर्चाला मजूर संघाचा पाठिंबा
कोल्हापूर : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक महामोर्चाला कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थाच्या संघातर्फे सोमवारी पाठिंबा जाहीर करण्यात आला. शाहूपुरी येथील संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष उदय जोशी यांनी मराठा आरक्षणाविषयी व निघणाऱ्या मोर्चाविषयी माहिती दिली. ग्रामीण भागामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज अद्याप गरीब आहे. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता व आर्थिक प्रगती व्हावयाची असेल तर त्यांना आरक्षण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला भीमराव नलवडे, सम्राटसिंह पाटील, सुभाषराव साळोखे, जयसिंगराव पाटील, संभाजी पाटील, शशिकांत पोवार, शरद करंबे, मधुकर शिंदे, विश्वनाथ कांबळे, महादेव सांगळे, आनंदा पाटील-बेकनाळकर, आदी उपस्थित होते.
मराठा मोर्चा नियोजनासाठी पोर्लेत बैठक
पोर्ले तर्फ ठाणे : मराठा क्रांती मूक मोर्चासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथे नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी नियोजन समितीची निवड करण्यात आली. याप्रंसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, सरपंच भाऊसो चौगुले, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सर्जेराव सासने, ग्रामपंचायत सदस्य गणपती चेचर, गणा जाधव, तंटामुक्तचे अध्यक्ष संभाजी जमदाडे, सेनाध्यक्ष राहुल पाटील, बळी चेचर, सरदार पाटील, सागर पाचगावकर, प्रवीण पाटील, शहाजी पाटील, रामराव चेचर, सचिन घाटगे, आदी उपस्थित होते.
पारगावातील मुस्लिम समाजाचा पाठिंबा
नवे पारगाव : कोल्हापूर येथे निघणाऱ्या मराठा समाज क्रांती मोर्चास पारगाव (ता. हातकणंगले) येथील मुस्लिम समाजाचा पाठिंबा असल्याचे निवेदन मुस्लिम बांधवांनी पारगाव येथील मोर्चाच्या संघटकांकडे दिले आहे.निवेदनात म्हटले आहे, राज्याच्या प्रगतीसाठी समस्त मराठा समाजाचे मोठे योगदान आहे. आरक्षणाअभावी मराठा समाजातील मुलांना संधी मिळत नाही. आरक्षणाबरोबरच अन्य मागण्यांबाबत मराठा समाज आज एकवटला आहे. राज्यातील शिस्तबद्ध मूक मोर्चाने मराठा समाजाने आणखी एक इतिहास घडवला आहे. निवेदनावर सरपंच अपरोज शिगावे, धोंडिलाल बारगीर, मुराद मुल्ला, हसन बारगीर, अमीन मोमीन, शकील पठाण, गुलाब पिरजादे, सादिक फरास, रमजान शेख, आदींच्या सह्या आहेत.
भोगावती परिसरातून ३0 हजार लोकांचा सहभाग
सडोली (खालसा) : मराठा समाजातील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मराठा आरक्षण मिळणे गरजेचे आहे. या मूक मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून मराठा एकजूटीची ताकद दाखवा, असे प्रतिपादन मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी केले. ते हळदी (ता. करवीर) येथे भोगावती खोऱ्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या नियोजन बैठकीत बोलत होते. या मोर्चासाठी भोगावती परिसरातून ३0 हजार लोक उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी रघुनाथ जाधव, हंबीरराव पाटील, संभाजी पाटील, बाबासो देवकर, सर्जेराव पाटील, दिगंबर मेडसिंगे, कुणाल धोत्रे, संदीप पाटील, उपसरपंच शंकर पाटील, शरद पाटील, तानाजी निकम, शिवाजी कारंडे, प्रा. पवन पाटील आदी उपस्थित होते.
े कुंभोजमध्ये महिलांच्या सहभागासाठी आवाहन
कुंभोज : मराठा मोर्चासाठी कुंभोज (ता. हातकणंगले) येथून संपूर्ण मराठा कुटुंबातील महिलांनीही सहभागी होण्याचा निर्धार नियोजन बैठकीत झाला. कुंभोजमधून सात हजार लोकांनी सहभागी व्हावे यासाठी समाजातील प्रमुख मंडळींकडून घरोघरी जाऊन आवाहन करण्यात येत आहे. येथील हनुमान मंदिरात पार पडलेल्या मोर्चाच्या नियोजन बैठकीस वारणा दूध संघाचे संचालक अरुण बाबासाहेब पाटील, उपसरपंच अभिजित जाधव, जवाहर साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब साजणकर, अॅड. अमित साजणकर, ग्रा. पं. सदस्य कलगोंडा पाटील, जहॉँगीर हजरत, दीपक पोवार, प्रमोद सपकाळ, किरण माळी, योगेश साजणकर, समोशरण भोकरे, मराठा समाजाबरोबरच इतर समाजबांधव बैठकीस उपस्थित होते. मराठा मोर्चास गावातील जैन, नाभिक, हणबर व मुस्लिम समाजाने पाठिंबा दर्शविला आहे.