कॅप्टन शरद पवार जहाज पैलतीराला नेतील : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:28 PM2019-07-29T14:28:26+5:302019-07-29T14:29:58+5:30
प्रचंड वादळ वाऱ्यात आणि खवळलेल्या समुद्रातही कॅप्टन शरद पवार हे राष्ट्रवादीचे जहाज पैलतीराला नेऊन लावतील. जहाज बुडतंय अस समजून पळून गेलेल्या उंदरांची अवस्था मात्र त्यावेळी बघण्यासारखी होईल, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला.
कसबा सांगाव : प्रचंड वादळ वाऱ्यात आणि खवळलेल्या समुद्रातही कॅप्टन शरद पवार हे राष्ट्रवादीचे जहाज पैलतीराला नेऊन लावतील. जहाज बुडतंय अस समजून पळून गेलेल्या उंदरांची अवस्था मात्र त्यावेळी बघण्यासारखी होईल, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला.
येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता येणार असा विश्वासही आमदार मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला. मौजे सांगाव ता कागल येथे घेण्यात आलेल्या माऊली विकास संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात आमदार मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी सुमन युवराज पाटील होत्या.
मुश्रीफ म्हणाले, पाच वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेनेच्या सरकारने राज्यातील जनतेची घोर फसवणूक केली आहे. बंद पडलेल्या कंपन्या आणि उद्योगधंद्यांमुळे बेरोजगारीने तर कळसच गाठला आहे. त्यामुळे अपयश पदरी आलेले सरकारमधील हे पक्ष कितीही आमदार विकत घेऊ देत,आमदारांवर कितीही दबाव टाकू देत.
येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच त्यांना धुळीस मिळवेल.राष्ट्रवादी पक्ष सोडून पळून जाणा?्यांवर टीकास्त्र सोडताना आमदार मुश्रीफ म्हणाले, शरद पवारांनी अनेकांना मंत्री केले , सत्ता दिल्या , मोठमोठी पदे दिली आणि त्यांची भरभराटही झाली. आज मात्र पवारसाहेबांचा वृद्धापकाळ असताना ते त्यांना सोडून जात आहेत , ही बाब लाजिरवाणी आहे. कुणी काहीही करो , मी मात्र खंबीरपणे घट्ट पाय रोवून पवारसाहेबांसोबत त्यांच्या पाठीशी उभा आहे.
स्वागत बाजार समितीचे माजी अध्यक्ष कृष्णात पाटील यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन के आर पाटील यांनी केले. सरपंच सौ स्वाती नंदकुमार पाटील यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर कागलच्या नगराध्यक्ष माणिक माळी, सबीना मुश्रीफ,अमरीन मुश्रीफ, वंदना पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.
भोग सरलं, सुख येईल........
मुश्रीफ म्हणाले, राज्यातील आजघडीचे सत्ताकारण कितीही अस्थीर असो. परंतु मला मात्र ठाम विश्वास आहे , दिस जातीलं, दिस येतील ! भोग सरलं, सुख येईल....