थरकाप! थांबलेल्या ट्रकवर कार वेगानं आदळली, महिला डॉक्टरसह मुलगी ठार; पती गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 10:43 PM2022-03-13T22:43:52+5:302022-03-13T22:44:13+5:30
पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगत थांबलेल्या ट्रकवर इनोव्हा कार जोरात आदळल्याने संकेश्वरची महिला डॉक्टर, मुलगी जागीच ठार
संकेश्वर:
पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगत थांबलेल्या ट्रकवर इनोव्हा कार जोरात आदळल्याने संकेश्वरची महिला डॉक्टर, मुलगी जागीच ठार झाली तर डॉक्टर पती गंभीर जखमी झाले आहेत. डॉ. श्वेता सचिन मुरगुडे (वय ४१) श्रेया सचिन मुरगुडे (वय ७,रा.संकेश्वर ) अशी मृतांची नावे आहेत. डॉ. सचिन शिवानंद मुरगुडे ( वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी साडेचारच्या सुमारास हत्तरकीजवळील बेनकोळी गावानजीक हा अपघात झाला.
घटनास्थळ व पोलीसातून मिळालेली माहिती अशी : संकेश्वर येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ सचिन मुरगुडे हे दुपारी पत्नी श्वेता व कन्या श्रेया यांच्यासह काही कामानिमित्त इनोवाकारने( क्र.के.ए.२३/एन ४२६१) बेळगावला गेले होते. दरम्यान,बेळगावहून संकेश्वरला येत असताना हत्तरकीनजीकच्या बेनकोळी गावाजवळ आल्यावर त्यांचा कारवरील ताबा सुटला.त्यामुळे कार रस्त्यालगत थांबलेल्या मालवाहू कंटेनरवर जोरात आदळली. त्यामुळे डॉ. श्वेता व श्रेया यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ सचिन हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बेळगावच्या के. एल.ई. इस्पितळात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.
संकेश्वर येथे मुरगुडे यांचे नेत्र रुग्णालय आहे. मृत श्वेता या नेत्ररोग तज्ज्ञ होत्या तर श्रेया ही येथील खाजगी शाळेत तिसरी शिकत होती तर जखमी डॉ.सचिन हे सीमाभागातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. गेल्या वर्षीच डॉ.सचीन यांचे वडील डॉ.शिवानंद यांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई व बहिण असा परिवार आहे. यमकनमर्डी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.