Kolhapur: ‘ब्रेन स्ट्रोक’आल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटले, शवविच्छेदन अहवालातून सायबर अपघाताचे कारण स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 02:22 PM2024-06-06T14:22:47+5:302024-06-06T14:23:25+5:30
अपघातात चौघांचा गेला होता जीव
कोल्हापूर : कारचालक डॉ.वसंत मारुती चव्हाण यांच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्याने नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले. सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. ५) शवविच्छेदनाचा अहवाल राजारामपुरी पोलिसांना दिला. दरम्यान, व्ही.एम. चव्हाण यांच्या मृतदेहावर बुधवारी सकाळी पंचगंगा स्मशानघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व्ही.एम. चव्हाण यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. त्यांची हृदयविकाराची एक शस्त्रक्रिया झाली होती. सोमवारी दुपारी कार चालविताना सायबर चौकाजवळ पोहोचताच त्यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास सुरू झाला. तीव्र त्रास होऊन मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्याने त्यांचे शरीरावरील नियंत्रण सुटले. यातच अपघात झाल्याचा निष्कर्ष शवविच्छेदनातून समोर आला.
अपघातानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनाचा अहवाल बुधवारी राजारामपुरी पोलिसांना प्राप्त झाला. दरम्यान, व्ही.एम. चव्हाण यांच्या मुली आणि मुलगा पोहोचताच, बुधवारी सकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.