Kolhapur: कठडा तोडून मध्यरात्री कार वारणा नदीत कोसळली, 'जीपीएस'मुळे घटना उघडकीस आली
By पोपट केशव पवार | Published: July 25, 2024 07:39 PM2024-07-25T19:39:48+5:302024-07-25T19:40:59+5:30
कार नदीपात्राबाहेर काढण्याचे काम सुरु
संतोष भोसले
कोल्हापूर/किणी : कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील पुणे -बंगळूरू महामार्गावर असणाऱ्या वारणा नदीच्या पुलावरुन पुलाचा कठडा तोडून कार थेट नदीत कोसळल्याची घटना काल, बुधवारी मध्यरात्री घडली. जीपीएस प्रणालीवरुन ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या कारमध्ये किती लोक होते हे अद्याप समजले नसून कार नदीमधून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
कोल्हापुरहून पुण्याच्या दिशेला जाणारी कार बुधवारी मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास किणी टोल नाका (ता. हातकणंगले) जवळील वारणा नदीच्या पुलावर आली असता ती पुलाच्या सुरुवातीलाच कठडा तोडून थेट नदीत कोसळली. कारचालक व त्यामधील व्यक्ती नियोजित स्थळी न पोहचल्याने गुरुवारी सकाळपासूनच त्यांची शोधाशोध सुरु होती.
जीपीएस प्रणालीद्वारे त्यांचा शोध घेतला असता वारणा नदीवरील पुलावर त्यांचे शेवटचे लोकेशन दाखवण्यात आले. त्यामुळे पेठवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चार तरुणांनी नदीत शोधाशोध केली असता कार आढळून आली. सध्या ही कार नदीपात्राबाहेर काढण्याचे काम सुरु आहे.