किणी टोलनाक्यावर कार उलटून एक ठार

By admin | Published: February 21, 2016 01:01 AM2016-02-21T01:01:57+5:302016-02-21T01:01:57+5:30

चौघे गंभीर : मृत अहमदाबादचा बांधकाम व्यावसायिक

A car hit a tollanak in Kinna and killed one | किणी टोलनाक्यावर कार उलटून एक ठार

किणी टोलनाक्यावर कार उलटून एक ठार

Next

कोल्हापूर/ किणी : पुणे-बंगलोर महामार्गावर किणी टोलनाका येथे शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भरधाव कार व दुचाकीच्या अपघातात कार दुभाजकाला धडकून उलटल्याने अहमदाबाद येथील बांधकाम व्यावसायिक जागीच ठार झाला, तर चौघेजण गंभीर जखमी झाले. बांधकाम व्यावसायिक चिराग मनसुभाई पांचाल (वय ३०) असे त्याचे नाव आहे. तसेच हिरेन ऊर्फ हरीश बाबूलाल पांचाल (२८), प्रणव सूरजभाई मोदी (२८, सर्व रा. नरोडा, अहमदाबाद), संदेश काशिनाथ तोडकर (४४), अभिजित बाबासो यादव (३५, दोघे रा. इंद्रा कॉलनी, इस्लामपूर) हे गंभीर जखमी झाले.
अधिक माहिती अशी, प्रणव मोदी त्याचे मित्र चिराग पांचाल व हिरेन पांचाल असे तिघेजण गोवा येथील मोटारसायकल शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी तीन दिवसांपूर्वी गेले होते. शर्यतीनंतर गोव्याचा फेरफटका मारून शनिवारी सकाळी ते अहमदाबादला जाण्यासाठी कारमधून निघाले.
सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावर येताच समोरील दुचाकीला ओलांडून जाताना तिला धडकून कार दुभाजकाला आपटून उलटली. त्यामध्ये कारमधील चिराग, हिरेन व प्रणव यांच्यासह मोटारसायकलीवरील संदेश तोडकर व अभिजित यादव हे गंभीर जखमी झाले. मोटारसायकल व कार दोन्हीही भरधाव होत्या. अपघातादरम्यान मोठा आवाज झाला.
जखमींच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी व वाहनधारकांनी कारखाली सापडलेल्या तिघांना बाहेर काढले. त्यांना शासकीय रुग्णवाहिकेतून तातडीने सीपीआर रुग्णालयात आणले.
याठिकाणी उपचारांपूर्वीच चिराग याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हिरेन याचा पाय व उजवा हात मोडला, तर प्रणवच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. दुचाकीवरील संदेश व अभिजित यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या सर्वांवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: A car hit a tollanak in Kinna and killed one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.