Kolhapur: २५ लाख लूटप्रकरणी बोगस तपासणी अधिकाऱ्यांच्या कारची ओळख पटली, लवकरच उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 04:16 PM2024-11-14T16:16:56+5:302024-11-14T16:18:58+5:30
रकमेबाबत संभ्रम
कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गालगत तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ तपासणी अधिकारी असल्याचे सांगून एका व्यावसायिकाची २५ लाख ५० हजारांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. संशयितांच्या निळ्या रंगाच्या कारची ओळख पटवण्यात यश आले आहे. दोन दिवसांत गुन्ह्याचा उलगडा होईल, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. दरम्यान, फिर्यादी सुभाष लक्ष्मण हारणे (वय ५०, रा. बागल चौक, कोल्हापूर) यांच्याकडे गांधीनगर पोलिसांनी बुधवारी सलग सहा तास चौकशी केली.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शासकीय तपासणी नाके आणि पथकांकडून संशयास्पद वाहनांची झडती घेतली जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन बोगस तपासणी पथकाने व्यावसायिक सुभाष हारणे यांना कारवाईची भीती घालून त्यांच्याकडील २५ लाख ५० हजारांची रोकड आणि त्यांचा मोबाइल लंपास केला. मंगळवारी (दि. १२) पहाटे हा प्रकार उघडकीस येताच जिल्ह्यात खळबळ उडाली.
पोलिसांनी तातडीने बोगस अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत. कारचा प्रवास कुठून कुठे झाला? रोकड लुटल्यानंतर ती कोणत्या दिशेला गेली? याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. लवकरच संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश येईल, असे आयजी फुलारी यांनी सांगितले.
संशयित स्थानिक असावेत
तपासणी अधिकारी असल्याचे भासवून लूट करणारे संशयित फिर्यादीशी कोल्हापुरी पद्धतीने बोलत होते. त्यांची कार काही वेळ या परिसरात फिरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यावरून ते स्थानिक असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. फिर्यादी हारणे यांच्यावर पाळत ठेवून लूट केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.
रकमेबाबत संभ्रम
जत्रेत पाळणे लावणाऱ्या व्यावसायिकाकडे एका वेळी २५ लाखांची रक्कम कशी काय असू शकते? ही रक्कम कोणत्या यात्रेतून आणली होती? यात आणखी कोणाचा वाटा आहे काय? याबाबत स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे रक्कम नेमकी किती होती आणि ती कशाची होती? याचा छडा लावण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्यासाठी पोलिसांनी बुधवारी फिर्यादी हरणे यांच्या घराची पाहणी करून त्यांची सहा तास चौकशी केली. चार वर्षांपूर्वी कर्नाटकात त्यांच्याकडील रकमेची लूट झाली होती, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.