शहरातील २० शाळांमध्ये कार्बनमुक्त कोल्हापूर मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 04:15 PM2020-03-06T16:15:55+5:302020-03-06T16:17:27+5:30
फ्रायडेज फॉर फ्यूचर या संस्थेमार्फत ‘कार्बनमुक्त कोल्हापूर २०२५’ ही मोहीम राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सुरू झाली आहे. पाण्याविषयीच्या पर्यावरण खेळातून सुरू झालेल्या या मोहिमेत कोल्हापुरातील ९ शाळांनी सहभाग घेतला असून, अजून ११ शाळा या आठवड्यात सहभागी होत आहेत.
कोल्हापूर : फ्रायडेज फॉर फ्यूचर या संस्थेमार्फत ‘कार्बनमुक्त कोल्हापूर २०२५’ ही मोहीम राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सुरू झाली आहे. पाण्याविषयीच्या पर्यावरण खेळातून सुरू झालेल्या या मोहिमेत कोल्हापुरातील ९ शाळांनी सहभाग घेतला असून, अजून ११ शाळा या आठवड्यात सहभागी होत आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महाराष्ट्र हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमातून या मोहिमेस प्रारंभ केला.
कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूल, उषाराजे हायस्कूल, विक्रम हायस्कूल, कसबा बावडा येथील भाई माधवराव बागल प्रशाला, भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल, उचगाव येथील न्यू माध्यमिक विद्यालय, नानासाहेब गद्रे हायस्कूल, राजर्षी शाहू विद्यालय आणि महाराष्ट्र हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्याविषयीचा पर्यावरण खेळ खेळत या मोहिमेत भाग घेतला. याशिवाय गेल्या आठवड्यात या खेळाचे प्रशिक्षण घेतलेल्या इतर ११ शाळा पुढील आठवड्यात या उपक्रमात सहभागी होत आहेत.
काय आहे कार्बनमुक्त मोहीम...
वायूप्रदूषणात कोल्हापूर शहर हे वरच्या क्रमांकावर असल्याने ते कार्बनमुक्त करणे ही अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे. यासाठी सायकल प्रवास आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करण्याने शहरातील कार्बनचे उत्सर्जन कमी करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट्य आहे. कोल्हापुरात नजीकच्या काळात इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत.
फ्रायडेज फॉर फ्युचर्सतर्फे पर्यावरण जागृती
स्वीडनमधील ग्रेटा थुनबर्ग हिच्या आंदोलनाने प्रभावित झालेल्या कोल्हापुरातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ ही संस्था सुरू केली आहे. या संस्थेमार्फत विविध शाळा आणि महाविद्यालयांत पर्यावरण जनजागृती करण्यात येत आहे.
पर्यावरणाच्या कठीण संकल्पना मुलांमध्ये खेळांद्वारे अत्यंत सहज पण खूप परिणामकारकरित्या रुजविता येतात. मुले नवीन गोष्टी लवकर आत्मसात करतात. त्यामुळे त्यांच्याद्वारे प्रत्येक परिवाराद्वारे होणारे प्रदूषण कमी करणे, कार्बन (फूटप्रिंट) पदचिन्ह कमी करणे शक्य आहे.
नितीन डोईफोडे,
पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर.