रेशन दुकानदार घेणार कार्डधारकांच्या मालमत्तेची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:43 PM2019-07-17T22:43:25+5:302019-07-17T22:43:58+5:30
सुनील साळुंखे । लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : सरकारच्या निर्णयानुसार रेशन दुकानदारांनी आता रेशन कार्डधारकांच्या मालमत्तेची माहिती भरून घ्यायची ...
सुनील साळुंखे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : सरकारच्या निर्णयानुसार रेशन दुकानदारांनी आता रेशन कार्डधारकांच्या मालमत्तेची माहिती भरून घ्यायची आहे़ यामध्ये कार्डधारकांच्या कुटुंबाच्या नावे दुचाकी, चार चाकी वाहने व जमीन नाही ना याची माहिती लिहून घेवून तसेच हमीपत्र पुरवठा विभागाला सादर करावयाचे आहे़ या माहितीमध्ये तफावत असल्यास दुकानदाराला शिक्षा होणार आहे़ तसेच थेट सरकारचे कोणतेही अधिकार नसतांना माहिती गोळा करायला गेलेल्या दुकानदार व ग्राहकांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
शासनाच्या पुरवठा विभागाने माहिती असलेले हमीपत्र दुकानदारांना पाठवून थेट कार्डधारकांची माहिती संकलीत करण्याचे आदेश दिले आहेत़ या सर्व्हेबाबत कोणताही थेट आदेश न देता आपल्या पातळीवरच हे हमीपत्र दुकानदारांना पाठविण्यात आले आहे़ यामध्ये कार्डधारकांच्या मालमत्तेची माहिती भरायची आहे़ त्यांच्या घरात दुचाकी, चारचाकी वाहने तसेच जमीन नाही याची खात्री करून ते यात नमूद करायचे आहे़ सरकारची पुरवठा व महसूल विभागाची स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा असतांना हे काम दुकानदारांना लावल्याने त्यांच्या संतप्त भावना आहेत़ रेशन दुकानदार कार्डधारकांच्या घरी जावून अशा पध्दतीने माहिती गोळा करायला लागल्यावर हे आमचे धान्यच बंद करायला आले आहेत, असा समज होण्याची शक्यता आहे़ तसेच आता बहुतांश लोकांच्या घरात दुचाकी वाहने आहेच, त्यामुळे दुकानदार व ग्राहकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे़ हे म्हणजे दोघांमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार पुरवठा विभागाकडून सुरू असल्याची चर्चा दुकानदारांमध्ये सुरू आहे़ तसेच या माहितीमध्ये तफावत आढळल्यास संबंधित दुकानदार शिक्षेस पात्र राहणार आहेत़ यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ इतर जिल्ह्यात दुकानदार संघटनांनी यास विरोध करून हा प्रकार हाणून पाडला आहे़ आता इतर जिल्ह्यातही ही हमीपत्रे आल्याने दुकानदारांनी त्याला विरोध करून ती न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला आहे़ इतक्या संवेदनशील विषयात आम्हाला पुढे करून शासन आमच्यात व ग्राहकांच्यात भांडणे लावून मजा बघते काय? असा प्रश्न दुकानदारांमधून उपस्थित होत आहे़
अपात्र शिधापत्रिकांच्या कागदपत्रांची होणार छाननी
*अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण २०१३/प्रक़्ऱ३७७/नापु २८ दिनांक १३ जून २०१९ अन्वये शासन परिपत्रक काढण्यात आले आहे़
४२०१२-१३ च्या लोकलेखा समितीकडून प्राप्त झालेल्या शिफारशीमध्ये अपात्र शिधापत्रिकांचे नियमित पुनर्विलोकन करणे बंधनकारक असतांना ते न झाल्यामुळे अथवा सदोष राहिल्यामुळे अपात्र कुटुंबियांना देखील लाभ मिळत आहे़ तसेच या योजनेतंर्गत पात्र ठरविण्यासाठी निश्चित केलेल्या निकषांतर्गत अंत्योदय, बीपीएल व प्राधान्य कुटुंब घटक म्हणून अर्जदाराने सादर केलेल्या माहितीची योग्य छाननी व शहानिशा, खात्री करूनच शिधापत्रिकाधारकांची पात्रता व अपात्रता अंतीम करण्यात यावी़
*मात्र त्यासाठी दुचाकी, चारचाकी व जमिनीची मालकी बाबत प्रादेशिक परिवहन विभाग व महसूल विभागांशी योग्य तो समन्वय ठेवून शिधापत्रिका धारकांच्या कागदपत्रांची छाननी व तपासणी करावी असा निर्देश देण्यात आला आहे़
*शिधापत्रिकांचे पुनर्विलोकन प्रत्येक महिन्याला सादर करावे, तसेच त्याचा सहामाही व वार्षिक अहवाल जुलै व जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनास सादर करावा़