आमदार जाधव यांच्याकडून पालिकेला कार्डियाक रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:23 AM2021-05-22T04:23:03+5:302021-05-22T04:23:03+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेला कार्डियाक रुग्णवाहिका घेण्याकरिता आमदार चंद्रकांत जाधव यांनी २३ लाख रुपयांचा निधी शुक्रवारी दिला. माजी ...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेला कार्डियाक रुग्णवाहिका घेण्याकरिता आमदार चंद्रकांत जाधव यांनी २३ लाख रुपयांचा निधी शुक्रवारी दिला. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत, निधीचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे आमदार जाधव यांनी सुपूर्द केले.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आदी उपस्थित होते.
राज्य शासनाने खास बाब म्हणून स्थानिक विकास निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामग्री व साहित्याकरिता एक कोटी रुपये खर्च करण्यास सहमती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयासाठी (सीपीआर) वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्यासाठी ४० लाख ५० हजार रुपयांचा निधी दिला आहे, तर शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिकेला ३६ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गंभीर रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन आदी अद्ययावत सुविधा असलेली 'कार्डियाक' रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक असते. मात्र कोल्हापूर महानगरपालिकेकडे अशी एकही रुग्णवाहिका नाही. त्यामुळे अशा रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे कार्डियाक रुग्णवाहिका महानगरपालिकेकडे असावी, असा मानस आमदार जाधव यांनी व्यक्त केला होता.
फोटो क्रमांक - २१०५२०२१-कोल-चंद्रकांत जाधव
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेस कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी २३ लाख रुपयांच्या निधीचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे शुक्रवारी दिले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.