‘सीपीआर’मध्ये होणार ५८ बालकांवर हृदयशस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:45 AM2018-02-26T00:45:05+5:302018-02-26T00:45:05+5:30
गणेश शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्याची आरोग्यवाहिनी व गरिबांचे आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर)मध्ये ५८ बालकांवर हृदयशस्त्रक्रिया व ३३ डिवाईस क्लोजर (विनाशस्त्रक्रिया पद्धत) करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी लहान बालकांपासून ते १८ वर्षांच्या युवकांसाठी हृदयरोग निदान व उपचार शिबिर झाले होते. त्यातील गंभीर बालकांवर पुणे, मुंबईऐवजी कोल्हापुरातच यशस्वी उपचार करण्याचा निर्णय सीपीआर प्रशासनाने घेतला, त्यानुसार या शस्त्रक्रिया होत आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय (कोल्हापूर), मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय सहाय्यता कक्ष व एसआरसीसी बालरुग्णालय (मुंबई) यांच्या कार्यक्रमांतर्गंत (आरबीएसके) ‘सीपीआर’मध्ये नुकतेच शिबिर घेण्यात आले. यामध्ये ३५७ बालकांची नोंदणी झाली होती. या बालकांच्या सर्वप्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.
सीपीआरचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना, डॉ. उदय मिरजे, डॉ. विदूर कर्णिक तसेच एसआरसीसी बालरुग्णालय (मुंबई) यांनी २८८ बालकांची २-डी-इको कार्डिओग्राफी तपासणी केली.
तपासणी केलेल्या बालकांपैकी ३३ बालकांना जन्मत: अशा हृदयछिद्रासारखे व्यंग आढळून आले व डिवाईस क्लोजरसारख्या विनाशस्त्रक्रिया पद्धतीचे उपचार करण्याकरिता निश्चित करण्यात आले तसेच ५८ बालरुग्णांना
विविध प्रकारचे हृदयरोग
आढळले.
ज्यांना विशेष प्रकारच्या हृदयशस्त्रक्रियांची गरज आहे त्या हृदयरोगक्रिया विभागाचे तज्ज्ञ डॉ. रणजित जाधव, डॉ. माजिद मुल्ला, डॉ. रणजित पोवार करणार आहेत.
६७ संशयित बालकांना तपासल्यानंतर सुदृढ ठरविण्यात आले आहे. तसा लेखी अहवाल पालकांना प्रशासनाने दिला. तसेच १०९ संशयित बालकांची निरीक्षण व पुनर्तपासणी करण्याची गरज असल्याने त्यांना पाठपुराव्याकरिता सल्ला देण्यात आला.
ज्या बालकांना हृदयरोग निदान झाले आहे. त्या बहुतांशी बालकांची महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गंत नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे. या उपक्रमाकरिता पालकमंत्री चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आदींनी विशेष प्रयत्न केले.
यांच्यावर मुंबईत उपचार
कमी वजन असलेल्या किंवा अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याची गरज असलेल्या काही बालकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून मुंबईतील रुग्णालयातून उपचार करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.