‘गोकुळ’ अध्यक्षपदाबाबत नेत्यांची सावध भूमिका
By admin | Published: September 12, 2016 01:06 AM2016-09-12T01:06:30+5:302016-09-12T01:06:30+5:30
तातडीने निर्णयाची शक्यता धूसर : ‘पी. एन.’ यांच्या कार्यकर्त्यांत चर्चा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ)च्या अध्यक्षपदाबाबत माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे. सर्वसाधारण सभेतील वातावरण, त्यातून अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर नेते तातडीने निर्णय घेण्याची शक्यता धूसर बनली आहे.
सर्वसाधारण सभेनंतर ‘गोकुळ’च्या दुधाने चांगलीच उकळी घेतली आहे. विरोधकांचे आव्हान ताकदीने मोडण्याची सत्तारूढ गटाची रणनीती काही प्रमाणात यशस्वी झाली; पण शेवटच्या क्षणी गोंधळ उडाल्याने सभेला गालबोट लागले. त्यातून ‘गोकुळ’मधील अंतर्गत राजकारणाने वेग घेतला आहे.
ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी अध्यक्षपदाबाबत घेतलेल्या उघड भूमिकेने ‘गोकुळ’च्या राजकारणात पडसाद उमटलेच; पण त्याचबरोबर पी. एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. नरके यांनी ‘करवीर’च्या राजकारणातून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला असला तरी ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा उघड प्रचार करणार का? तेथून पुढच्या राजकारणात ते पाटील यांच्याबरोबर राहणार का? असे विविध प्रश्न ‘पी. एन.’ यांच्या कार्यकर्त्यांमधून विचारले जात आहेत.
नरके यांना अध्यक्षपद द्यायचेच झाले तर त्यांनी ‘पी. एन.’ यांना उघड पाठिंबा आताच जाहीर करावा व त्याच्याशी ते ठाम राहिले पाहिजेत, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांतून व्यक्त केली जात आहे. अध्यक्षपदावरून सुरू झालेले राजकारण पाहता, नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची शक्यता धूसर बनली आहे. (प्रतिनिधी)
‘गोकुळ’कडून
स्पष्टीकरणाला विलंब!
४वार्षिक सर्वसाधारण सभेतील आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आरोपावर ‘गोकुळ’च्या वतीने स्पष्टीकरण देतील, असे वाटत होते; पण सभा संपून पाच दिवस झाले तरी त्यांच्याकडून स्पष्टीकरण झाले नसल्याने संस्थापातळीवर याची चर्चा सुरू आहे
यूथ बँक
सभास्थळीही चर्चा
४यूथ डेव्हलपमेंट बॅँकेची रविवारी सर्वसाधारण सभा होती. या बॅँकेचे अध्यक्ष अरुण नरके असल्याने त्यांनी ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाबाबत घेतलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा सभास्थळी होती. .