कोल्हापूरला नाईट लँडिंगसह कार्गो हब : सुरेश प्रभू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:03 AM2019-02-03T00:03:10+5:302019-02-03T00:03:41+5:30
कोल्हापूर विमानतळावर लवकरच नाईट लॅँडिंग सुविधेसह कार्गो हब निर्माण केले जाईल, अशी घोषणा नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे बोलताना केली. कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनल इमारत आणि
कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावर लवकरच नाईट लॅँडिंग सुविधेसह कार्गो हब निर्माण केले जाईल, अशी घोषणा नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे बोलताना केली. कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनल इमारत आणि एटीसी टॉवरचे रिमोट कंट्रोलद्वारे भूमिपूजन मंत्री प्रभू यांच्या हस्ते झाले. या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याची घोषणा केली.
मंत्री प्रभू म्हणाले, कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणानंतर येथे मोठी विमाने उतरतीलच तसेच जागतिक स्तरावरील सर्व सुविधा या विमानतळावर उपलब्ध करून देऊ. आज विमाने पाण्यावर उतरण्याची नवी योजनाही आखली आहे. उड्डाण-३ अंतर्गत २३५ ठिकाणी विमानसेवा सुरू होईल.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरच्या विमानसेवेसाठी राज्य शासनामार्फत आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल. राज्यात रस्ते, रेल्वे, विमानसेवा, जलसेवेद्वारे दळणवळणाच्या नवनव्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने ३० टक्क्यांचा हिस्सा म्हणून ८४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या विमानतळावर पार्किंग हब आणि कार्गो हब सुरू व्हावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात विमानसेवा सुरू करावी.’
कवठेमहांकाळ येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार संजय पाटील यांच्या कल्पनेतून ‘ड्रायपोर्ट’ सुरू होत आहे. यामध्ये पश्चिम महाराष्टÑातील, राज्याच्या भागातून निर्यात योग्य माल आणला जाईल. तेथून तो कोणत्या ठिकाणी पाठवायचा हे ठरविले जाईल, त्यामुळे गतीने मालाची वाहतूक होईल, त्याचाच एक भाग म्हणजे कोल्हापूर विमानतळ होय. विमानतळाच्या आतील भागातील स्टॉल हे महिला बचत गटांना देण्यात येणार असून त्यामुळे कोल्हापूरच्या वस्तू, पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध होईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. खा. राजू शेट्टी यांनी दिल्ली ते कोल्हापूर विमानसेवा सुरू करावी. येथील भाजीपाला, गूळ निर्यातसाठी कृषी माल वाहतूक हवाईसेवा सुरू करावी, अशी मागणी केली.
राजाराम महाराज यांचे नाव का..?
राजाराम महाराज यांनी १९३९ ला कोल्हापूर विमानतळासाठी २७४ एकर जागा दिली होती. त्याकाळी कोल्हापूर-मुंबई विमानसेवाही सुरू केली होती. अशा महाराजांची स्मृती कायम राहावी यासाठी राजाराम महाराज प्रेमींकडून राष्ट्रीय मोडी विकास प्रबोधिनीतर्फे २००४ ला या विमानतळास राजाराम महाराज यांचे नाव देण्याची मागणी सर्वप्रथम करण्यात आली.
विमानतळावर शिव-शाहू-संभाजी संग्रहालय
मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, ‘कोल्हापूर विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देणारे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याची माहिती देणारे तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची माहिती देणारे दर्जेदार संग्रहालय उभे केले जाईल, यासाठी केंद्र व राज्य शासन निश्चितपणे पुढाकार घेईल.’
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे पूर्णत्वास नेऊ
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाºया कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्गास केंद्राने मान्यता दिली असून, त्यासाठी पाठपुरावा करून हे काम निश्चितपणे पूर्णत्वाला नेऊ, अशी ग्वाही मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे दिली. कोल्हापुरातील शाहू महाराज टर्मिनस येथे उभारलेल्या नवीन विश्रामकक्षाचे व पादचारी पुलाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
कोल्हापूर विमानतळाच्या नव्या आराखड्याच्या प्रतिकृतीचे निरीक्षण करताना केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू. शेजारी चंद्रकांत पाटील, संभाजीराजे, डॉ. डी. वाय. पाटील, एन. के. शुक्ला, धनंजय महाडिक, आदी उपस्थित होते.