उद्यापासून कोयनेतून कर्नाटकचे पाणी बंद
By admin | Published: April 28, 2016 11:39 PM2016-04-28T23:39:33+5:302016-04-29T00:50:07+5:30
आणखी एक टीएमसीची मागणी : अक्कलकोटला पाणी देण्यास विलंब
सदानंद औंधे-- मिरज
कोयनेतून एक टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर आणखी एक टीएमसी पाण्याची मागणी कर्नाटकने केली आहे. मात्र, राज्य शासनाने कर्नाटकला आणखी पाणी सोडण्याबाबत असमर्थता दर्शवून अक्कलकोटला पाणी सोडण्याची मागणी केली आहे. उद्या, शनिवारपासून कोयनेतून कर्नाटकसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येणार आहे.
कर्नाटक सीमाभागात तीव्र पाणीटंचाई असल्याने बुधवारपासून कोयना व वारणा धरणांतून एक टीएमसी पाणी सोडण्यात आले. कर्नाटकातील जमखंडीजवळ हिप्परगी धरणापर्यंत हे पाणी पोहोचले आहे. राजापूर बंधाऱ्यातून ६०० एमसीएफटी पाणी कर्नाटकात गेले असून, उद्यापर्यंत एक टीएमसी पाणी कर्नाटकात पोहोचणार असल्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्या कोयना धरणातून विसर्ग बंद करण्यात येणार असून, गुरुवारपासून कोयनेतून प्रतिसेकंद चार हजार क्युसेक्स वेगाने सोडण्यात येणारे
णी दोन हजार क्युसेक्स प्रतिसेकंद करण्यात आले आहे. कर्नाटकात हिप्परगी धरणापर्यंत पाणी पोहोचले असून, पाच टीएमसी क्षमतेच्या हिप्परगी धरणात पाणीसाठा करण्यासाठी आणखी एक टीएमसी पाणी सोडण्याची कर्नाटकची मागणी आहे. पाणी सोडण्याच्या मागणीसाठी कर्नाटकातील शिष्टमंडळाने मुंबईत तळ ठोकला आहे. कोयनेची वीजनिर्मिती थांबवून दहा टीएमसी पाणीसाठा सिंचन व पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येत आहे. या पाणीसाठ्यापैकी आणखी एक टीएमसी पाण्याची कर्नाटकची मागणी आहे. मात्र, कोयना व वारणा धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. जूनमध्ये पाऊस पडला नाही, तर उर्वरित पाणी आवश्यक असल्याने कर्नाटकला आणखी पाणी देण्यास जलसंपदा विभागाने असमर्थता दर्शविली आहे.
कर्नाटकसाठी कोयना व वारणेतून तातडीने पाणी सोडण्यात आल्यानंतर कर्नाटकातून पाणी देण्यासाठी विलंब करण्यात येत आहे. कर्नाटकला एक टीएमसी पाणी देताना नारायणपूर धरण व हिरेपडसलगी योजनेतून अक्कल-कोटला पाणी सोडण्याचे ठरले आहे. मात्र, अद्याप पाणी सोडले नसल्याने कर्नाटकातून अक्कलकोटला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाण्याची देवाण-घेवाण
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगावसह अन्य दुष्काळी भागाचा दौरा करून पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी यापुढे दरवर्षी महाराष्ट्रासोबत चार टीएमसी पाण्याची देवाण-घेवाण करू, असे जाहीर केले. गुरुवारी बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी उगार येथे पाहणी करून महाराष्ट्रातून आणखी पाणी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले.