श्रेयवादातून भडगावच्या स्मशानशेड कामाला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2016 11:27 PM2016-07-20T23:27:18+5:302016-07-21T01:02:17+5:30

अंत्यसंस्काराला जागाच नाही : रस्त्यावरच द्यावा लागतो अग्नी

Carnibles from Bhadgaon | श्रेयवादातून भडगावच्या स्मशानशेड कामाला ‘खो’

श्रेयवादातून भडगावच्या स्मशानशेड कामाला ‘खो’

googlenewsNext

मुरगूड : कागल तालुक्यातील भडगाव मध्ये ६० वर्षांपासून प्रलंबित असलेला स्मशानशेडचा प्रश्न आजही आहे त्या अवस्थेतच आहे. ग्रामपंचायतीने मिळालेल्या निधीतून स्मशानशेड बांधण्यास सुरुवात केली; पण जागेच्या वादातून हा प्रश्न न्यायालयात गेला आहे. कामास परवानगी मिळते तर कधी स्थगिती, त्यामुळे स्मशानशेडचा प्रश्न अधांतरी राहिला आहे. त्यामुळे सध्यातरी गावातील मृत लोकांवर रस्त्याकडेला किंवा शेतजमिनीत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
मुरगूडपासून तीन किलोमीटर अंतरावर असणारे भडगाव हे प्रगतशील गाव आहे. राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रांत गावाचा लौकिक आहे. अगदी राज्यपातळीपर्यंतची अधिवेशने, कबड्डी सामने या गावात अत्यंत उत्साहात पार पडले आहेत; परंतु, ‘गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं’ अशीच काहीशी गावची अवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी येथील एका भूमिहीन महिलेवर मुख्य रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्यात आले, तर विजेच्या धक्क्याने मृत झालेल्या दुर्दैवी बापलेकांवर त्यांच्या नातलगांच्या शेतात चिखलात सरन रचून ऐन पावसामध्ये अंत्यसंस्कार करावे लागले. याला स्मशानशेडच्या श्रेयवादाचे राजकारण कारणीभूत ठरत आहे. या घटनेची चर्चा गावासह मुरगूड परिसरात होत आहे.
गावातीलच एका भूमिहीन महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. गावात स्मशानशेड नाही, स्वत:ची शेती किंवा रिकामी जागाही नाही, त्यामुळे नेमके कुठे अंत्यसंस्कार करायचे? असा प्रश्न निर्माण झाला. अखेर कागल-मुरगूड रस्त्यावरील रिकाम्या जागेत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला. परंतु, त्या ठिकाणीही काही नागरिकांनी विरोध केला. अखेर मुख्य रस्त्याकडेलाच अंत्यसंस्कार करण्यात आले. कागल-मुरगूड रस्त्याकडेला सरन रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या नातेवाइकांवर आली. त्यालाही आमच्या शेतीसमोर नको,म्हणून विरोध होत असताना संतप्त नातेवाइकांकडून पोलिसांत तोंडी तक्रार देण्यात आली. अखेर ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित मंडळींनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार पार पडले. या निमित्ताने पुन्हा एकदा स्मशानशेडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून स्मशानशेडचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
येथील स्मशानशेडचे जागेअभावी काम रखडले होते. गतसाली सरपंच कल्पना पाटील व ग्रामपंचायतीने गावातील जाणकारांच्या मदतीने जागेचा प्रश्न मिटवला होता. त्यासाठी जिल्हा परिषद फंडातून निधी मंजूर होऊन बांधकामास प्रारंभही करण्यात आला होता. काम अंतिम टप्प्यात असतानाच पुन्हा जागेचा प्रश्न उफाळून आला आणि प्रकरण न्यायालयात गेले. पहिला निकाल ग्रामपंचायतीच्या बाजूने लागला आणि स्मशानशेडचे काम अंतिम टप्यात असतानाच न्यापालयाने स्थगिती दिली आहे. (वार्ताहर)

जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवा
ज्याची स्वत:ची शेती, मोकळी जमीन आहे, त्यांच्या नातेवाइकाचा मृत्यू झाल्यास ते आपआपल्या शेतात अंत्यसंस्कार करतात. परंतु जे गरीब आहेत, भूमिहीन आहेत, ज्यांची काहीच जमीन नाही, त्यांनी कुठे जायचे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सुजलाम् सुफलाम् असणाऱ्या गावात राजकारणातून व श्रेयवादातून स्मशानशेडच्या बांधकामाला ‘खो’ ंबसणे दुर्दैवी आहे. ऐन पावसाळ्यामध्ये उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. गावातील सर्व गटा-तटांच्या लोकांनी मोठ्या मनाने मानसिकता दाखवून हा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांसह परिसरातून होत आहे.

Web Title: Carnibles from Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.