मिरजेतील सराईताचा कर्नाटकात शोध
By admin | Published: March 25, 2015 01:16 AM2015-03-25T01:16:02+5:302015-03-25T01:18:39+5:30
पथकांचा कर्नाटकात तळ : वसतिस्थाने, हॉटेलमध्ये झाडाझडती
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांची हत्या मिरज येथील एका सराईत गुन्हेगाराने केल्याच्या संशयावरून कोल्हापूर पोलीस त्याचा कर्नाटकात कसून शोध घेत आहेत. येथील गुन्हेगारी वसतिस्थाने, हॉटेल-लॉजचे झडतीसत्र सुरू असून, येथील सराईत गुन्हेगारांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून त्याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांच्या विशेष सूत्रांनी सांगितले. मिरजेतील दाम्पत्याने दिलेल्या माहितीची पोलीस अत्यंत बारकाईने चाचपणी करत आहेत. संबंधित गुन्हेगार हा पानसरे यांच्यावरील हल्ल्यापासून गायब असल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. त्यामुळे कोल्हापूर येथील काही विशेष पथके बंगलोर, बेळगावसह सीमाभागात तळ ठोकून आहेत. पोलिसांचा तपास सुरुवातीपासूनच गोपनीय पातळीवर सुरू आहे. त्याची चाहूल कोणालाही लागू नये, याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. पोलिसांची २५ विशेष पथके काम करीत आहेत. प्रत्येक पथकाचा स्वतंत्र तपास सुरू आहे. त्याची एकमेकांना माहिती दिली जात नाही. पोलीस अधीक्षक शर्मा या सर्वांकडून एकत्रित माहिती घेत आहेत. (प्रतिनिधी)
कोल्हापूरच्या बाहेर तपास
हत्येचे गूढ उकलण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारी टोळ्यांकडे आतापर्यंत दहा ते बारावेळा ताब्यात घेऊन चौकशी केली असता कोणताच धागादोरा हाती लागला नाही. तपासाचे धागेदोरे मिरज-कर्नाटकात मिळण्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. त्यामुळे शहरात राजारामपुरी, जुना राजवाडा, करवीर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांवर तपासाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांचा आढावा इचलकरंजी विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार हे सुभाषनगर पोलीस चौकीतून घेत आहेत तर सुमारे वीस पथके कर्नाटक, मिरज, सांगली व कऱ्हाड परिसरात तपास करीत असल्याचे समजते.
पानसरे हत्या प्रकरण