महापालिका हद्दीत काेरोना कमी; पॉझिटिव्हीटी रेट १.७३ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:28 AM2021-08-19T04:28:53+5:302021-08-19T04:28:53+5:30
जुलै महिन्यात कोल्हापुरात डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळून आले; परंतु या सर्व रुग्णांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या ३०० लोकांची तपासणी ...
जुलै महिन्यात कोल्हापुरात डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळून आले; परंतु या सर्व रुग्णांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या ३०० लोकांची तपासणी केली असता सर्वांची तब्बेत ठीक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डेल्टा प्लसचा सध्या एकही रुग्ण कोल्हापूर शहरात नाही, असा दावा बलकवडे यांनी केला.
शहरातील कोरोना बाधितांची टक्केवारी तसेच मृत्यूचा दरही कमी झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात २.१ टक्के तर दुसऱ्या आठवड्यात १.७३ इतक्या खाली बाधितांची टक्केवारी घसरली आहे. मृत्यूचे प्रमाण जूनमध्ये १.१५ टक्के तर जुलैमध्ये ०.६१ टक्के इतके खाली आले आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने आराेग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. सध्या सहा कोविड केंद्र पूर्णत: बंद करण्यात आली आहेत तर सात केंद्रे सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.
-लसीकरणास वेग, पन्नास टक्के पूर्ण-
शासनाकडून लस उपलब्ध होत असल्याने वेग वाढला आहे. बुधवारी ४४६६ नागरिकांचे लसीकरण झाले. आतापर्यंत ६० वर्षांवरील नागरिकांचे ८० टक्के तर ४५ वर्षांवरील नागरिकांचे ५१ टक्के लसीकरण झाले आहे. घराजवळ जाऊन ३५० नागरिकांचे तर बेडवर झोपून असलेल्या २७४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहितीही बलकवडे यांनी दिली.
-लवकरच ॲन्टीबॉडीज तपासण्या-
राज्य शासनाच्या सूचनांनुसार शहरातील नागरिकांच्या ॲन्टीबॉडीज तपासण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने हा कार्यक्रम हाती घेतला जात आहे. याबाबत शहराची लोकसंख्या, डोस घेतलेल्यांची संख्या याची माहिती शासनाला देण्यात आली आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचनांप्रमाणे पुढील कार्यक्रम राबविला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.