काेरोना विषाणू आहेच ... उधळू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:22+5:302021-07-07T04:28:22+5:30
संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना आणि तेथील निर्बंध शिथिल होत असताना कोल्हापुरात मात्र कायम राहिले. रोज १५०० ...
संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना आणि तेथील निर्बंध शिथिल होत असताना कोल्हापुरात मात्र कायम राहिले. रोज १५०० ते २००० नवे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावरील निर्बंध काही केल्यास शिथिल केले जात नव्हते. गेले तीन महिने व्यापार, व्यवसाय बंद झाल्यामुळे अनेकांची आर्थिक कोंडी झाली होती. त्यामुळे व्यापारीवर्गातून निर्बंध शिथिल करून सरसकट सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी मागितली होती.
जिल्हाधिकारी ते राज्याचे प्रधान सचिव आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीचा आग्रह धरला गेला. पालकमंत्री पाटील व आमदार जाधव यांनी यात पुढाकार घेतला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी देखील मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन विनंती केली होती; परंतु जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी होत नसल्याचे कारण देत निर्बंध शिथिल करण्यास प्रधान सचिव नाखुश होते.
महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून निर्बंध शिथिल करण्याबाबत ना हरकत पत्र घेण्यात आले. त्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आल्यानंतर बलकवडे यांनीच व्यापाऱ्यांच्या मागणीची शिफारस सरकारकडे केली होती. सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असले तरी निर्बंध कायमचे हटविलेले नाहीत. पाच दिवसांकरिता ते हटविले आहेत. त्यामुळे पाच दिवस सांभाळून राहण्याची आणि कोरोनाचा संसर्ग वाढू न देण्याची जबाबदारी आता व्यापारी व शहरवासीयांवर आली आहे.
-साडेदहा वाजता निघाला आदेश -
रविवारी दुपारपासून पालकमंत्री पाटील, आमदार जाधव निर्बंध शिथिल करण्याच्या प्रक्रियेत होते. सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना आमदार जाधव यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटून तशी विनंती केली. थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, पण मंत्रिमंडळाची बैठक तीन तास चालल्याने रात्री उशीर होत गेला. रात्री दहा वाजता प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी होकार दिला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांना मंत्रालयात बोलविण्यात आले. त्यानंतर रात्री दहा वाजता त्यांनी निर्बंध शिथिल करण्याचा आदेश कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला.