काेरोनाची परिस्थिती गंभीर, तरीही पन्नास टक्के रुग्ण घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:23 AM2021-04-21T04:23:55+5:302021-04-21T04:23:55+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर बनली असून रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर बनली असून रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. असे असताना ही गेल्या साडेतीन महिन्यात एकूण रुग्णसंख्येच्या पन्नास टक्के रुग्ण गृह विलगीकरणात राहून म्हणजेच स्वत:च्या घरात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. त्यात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी असून घरात उपचार सुरु असताना मृत्यू होण्याचे प्रमाण देखील शून्य आहे.
कोरोना बाधित रुग्ण आढळून आला की रुग्णालयात जाऊन उपचार घेणे म्हणजे एका महाभयंकर अनुभवातून जावे लागेल, ही बहुतांश रुग्णाची भावना असल्याने तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्याकरिता गृह विलगीकरणास परवानगी देण्याची प्रशासनाची भूमिका यामुळे रुग्णालयापेक्षा गृह विलगीकरणात उपचार घेण्याची मानसिकता वाढली आहे. शासकीय रुग्णालयातील हेळसांड आणि खासगी रुग्णालयातील लुटमार हे ही एक कारण असून त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे.
जानेवारी महिन्याच्या एक तारखेपासून ते दि. १९ एप्रिलपर्यंत (साडेतीन महिन्यात) जिल्ह्यात ८,२१७ रुग्ण आढळून आले. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील ३,७९१ रुग्णांचा समावेश आहे. तर याच कालावधीत मृत्यू झालेल्या २०९ रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील १०४ रुग्णांचा तर कोल्हापूर शहरातील ६३ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यातील ४२ रुग्णांचा कोल्हापुरात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. गृह विलगीकरण होणाऱ्या रुग्णांची संख्या ही एकूण रुग्ण संख्येच्या निम्मी असली तरी घरात उपचार सुरु असताना कोणी दगावल्याची नोंद नाही.
सोमवारी जिल्ह्यात ४,०३४ सक्रिय कोरोना रुग्ण असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी ग्रामीण भागातील १,३३८ रुग्ण तर शहरी भागातील ६६३ रुग्ण स्वत:च्या घरातच राहून उपचार घेत होते. म्हणजेच सक्रिय रुग्णांपैकी निम्मे रुग्ण घरात उपचार घेत आहेत.
पॉईंटर -
- जिल्ह्यातील रुग्णसंख्या - (दि. १ मार्च २०२० ते दि. १९ एप्रिल २०२१)
- जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या - ५७ हजार ७५१
- कोरोनामुक्त रुग्णांची संख्या - ५१ हजार ८००
- सध्या उपचार सुरु असलेले रुग्ण - ४,०३४
- जिल्ह्यातील आतापर्यंतचे मृत्यू - १,९१७
- गृह विलगीकरणाची स्थिती - (१ जानेवारी ते १९ एप्रिल)
- ग्रामीण मधील गृह विलगीकरण संख्या - १,३३८
- शहरातील गृहविलगीकरण संख्या - ६६३
- कोविड सेंटर, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या - २,०३३
- ग्रामीण व शहरी रुग्णांचे मृत्यू - ( १ जानेवारी ते १९ एप्रिल)
- ग्रामीण भागातील मृत्यू संख्या - १०४
- शहरी भागातील मृत्यू संख्या - ०६३
- जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे मृत्यू - ४२
- गृह विलगीकरणातील मृत्यू - ००
- साडेतीन महिन्यात एकूण मृत्यू संख्या - २०९