माध्यमांशी बोलल्याबद्दल वाहक निलंबित : एस. टी. प्रशासनाची दडपशाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:50 AM2018-06-17T00:50:03+5:302018-06-17T00:50:03+5:30
प्रदीप शिंदे ।
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी केलेल्या राज्यस्तरीय संपाबाबत वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत भाग घेतल्याच्या कारणावरून कोल्हापूर विभागातील वाहक व इंटक चे विभागीय सचिव आप्पासाहेब साळोखे यांना एस.टी.महामंडळाने शनिवारी निलंबित केले. त्यामुळे प्रशासन दडपशाही करत असल्याचा आरोप कर्मचाºयांतून होत आहे.
राज्य परिवहन महामंडळाने चार वर्षांच्या करारापोटी चार हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली होती. मात्र, ही वेतनवाढ काही एस. टी. कर्मचाºयांना अमान्य असल्याने ८ व ९ जून रोजी कर्मचारी स्वत:हून ‘काम बंद’ आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाला कोणत्याही संघटनेने पाठिंबा दिलेला नसला तरी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कोल्हापूर विभागातील ९० टक्के वाहतूक व्यवस्था बंद होती.
त्याचदरम्यान ८ जूनला वृत्तवाहिनीवर संपाबाबत कोल्हापूर विभागातील वाहक व महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे विभागीय सचिव आप्पासाहेब साळोखे यांनी सहभाग घेतला. या चर्चेत ‘त्यांनी राज्य परिवहन प्रशासनाच्या ध्येय-धोरणाविरोधी मत मांडले होते. त्यामुळे बंदमध्ये सहभागी झालेल्या कर्मचाºयांना चिथावणी मिळाली आहे. त्यातून गैरशिस्तपणा दिसून येतो’, असा ठपका ठेवत महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने साळोखे यांना निलंबित केले. ही कारवाई व विनंती बदलीची यादी प्रशासन मागवत असून ते एकप्रकारे संपकरी कर्मचाºयांवर दडपशाही करीत असल्याची भावना होत आहे.
‘आप्पा’ सामान्य कार्यकर्ते
महामंडळातील कोल्हापूर विभागात १९८९ साली वाहक या पदावर साळोखे रुजू झाले. गगनबावडा आगार सचिवपदी त्यांनी काम केले आहे.
सर्वांना व अन्य संघटनांना सोबत घेऊन प्रशासनामधील सामान्य कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. इंटकच्या विभागीय सचिवपदी ते २००९ पासून काम करीत आहेत. प्रामाणिक व सामान्य कार्यकर्ते म्हणूनच ‘आप्पा’ ओळखले जातात.
संपर्क झाला नाही...
कोल्हापूर विभागीय कार्यालयास शनिवारी रमजान ईदची सुटी असूनसुद्धा प्रशासनाच्यावतीने त्यांना निलंबित केल्याचे पत्र देण्यात आले. याबाबत विभाग नियंत्रक रोहन पलंगे व वाहक साळोखे यांच्याशी संपर्क साधला; परंतु तो होऊ शकला नाही.
विनंती बदलीच्या कर्मचाऱ्यांची यादी
महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील ८ व ९ जूनच्या अघोषित संपाच्या कालावधीत बरेच कर्मचारी कामावर गैरहजर होते.
विभागामधील यादीनुसार विनंती बदली मागणाºया कर्मचाºयांपैकी पदनिहाय कोणकोणते कर्मचारी संपामध्ये सहभागी होते, त्यांची माहिती उद्या, सोमवारपर्यंत पाठविण्याचे पत्र कोल्हापूर विभागास वरिष्ठ प्रशासनाच्यावतीने प्राप्त झाले आहे.